वाकचौरे यांची भूमिका भाजपविरोधी : उदमले

अहमदनगर :

शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे सध्या भाजपमध्ये असूनही शिवसेनेकडे उमेदवारी मिळविण्यासाठी झटत आहेत. तसेच काहीवेळा अपक्ष लढण्याचीही भाषा ते करीत असतानाच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना स्पर्धक मानून विरोध करणात पक्षविरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळेच फ़क़्त पदासाठी राजकारण करणाऱ्या वाकचौरे यांनी भाजपमुळे मिळालेले शिर्डी संस्थानाचे विश्वस्तपद सोडण्याची मागणी भाजप नेते माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन उदमले यांनी केली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सध्या भाजपमध्ये असणारे वाकचौरे हे शिर्डी लोकसभा कोणत्याही परिस्थिती लढवायचीच ही भूमिका घेत आहेत. त्यांची ही भूमिका युती विरोधी व पक्ष विरोधी आहे. अशी भूमिका घेण्यापूर्वी त्यांना दिलेले श्री. साईबाबा संस्थानचे ट्रस्टीपद त्यांनी सोडणे गरजेचे होते. मात्र, आयुष्यात केवळ पद मिळवण्यासाठी झटणाऱ्या वाकचौरे यांच्याकडून ही अपेक्षा व्यर्थ असल्याने त्यांना ट्रस्टी पदावरून काढण्याची विंनंती मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांना केली आहे.

पुढे म्हटले आहे की, शिर्डीची जागा युतीमध्ये सेनेकडे आहे. सेनेकडे उमेदवारी मागताना भाजपने दिलेले पद त्यांनी का सोडले नाही? तुम्ही अपक्ष उमेदवारी करू म्हणता, इथे सगळे कार्यकर्ते मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जीवाचे रान करत असताना वाकचौरे युतीच्या उमेदवाराविरुद्ध लढण्याची गोष्ट करतात. म्हणजे वैयक्तिक स्वार्थ हेच त्यांचे राजकीय तत्वज्ञान आहे. ते जेव्हा सेनेतून काँग्रेसमध्ये आले व पडले त्यानंतर तत्कालीन कृषीमंत्री राधाकृष्ण विखे साहेब यांनी त्यांना राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळावर घेतले. मात्र, पुन्हा काँग्रेस सोडून भाजपत उमेदवारी करताना त्यांनी विद्यापीठाचे पद सोडले नाही. माझ्या पक्ष प्रवेशास त्यांनी विरोध केला. वास्तविक मी आजही पक्षाकडे कोणतेही पद मागितलेले नाही तरीही मला स्पर्धक मानून वाकचौरे मला विरोध करत राहिले. मात्र, मी प्रतिक्रिया दिली नाही. आता ते पक्ष विरोधी भूमिका घेत असल्याने त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. त्याचबरोबर पक्षातील जे लोक त्यांच्या पक्षविरोधी भूमिकेचे समर्थन करत आहे त्यांचीही वरिष्ठांना माहिती कळवणार आहे.
वाकचौरे यांनी तात्काळ शिर्डी संस्थानचा राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांना या पदावरून काढण्यासाठी विंनंती करणार आहे. पक्षात अनेक पात्र कार्यकर्ते आहेत त्यांना तिथे संधी मिळेल व अशा प्रवृत्तींना चपराक बसेल .

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*