नगरमध्ये तिरंगी; हे उमेदवार असतील रिंगणात

अहमदनगर :

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांनी भाजपवासी होत लोकसभा उमेदवारी पदरात पडून घेतली आहे. आता त्यांची उमेदवारी पक्की झाल्याने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट झाल्यात जमा असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी येथील एकूण राजकीय चित्र पाहता विखे यांना भाजपमधून निवडून येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते.

डॉ. सुजय यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कोणाला रिंगणात उतरविणार याची उत्सुकता कायम आहे. त्याचवेळी मराठा क्रांती मोर्चाचे नेते इंजिनीअर संजीव भोर यांनी आपली उमेदवारी जाहीर करीत येथील तिसरा आणि दमदार उमेदवार म्हणून विजयाचा दावा केला आहे. कोपर्डी घटनेने मराठा आणि बहुजन समाजमन पेटून उठल्याने राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विरोधात ५८ मोर्चे निघाले. त्याचे नेतृत्व करणाऱ्या टीममध्ये भोर होते. प्रस्थापित मराठा नेतृत्वाने समाजावर अन्याय केल्याची भावना मोठी आहे. तोच विचार भोर बोलून दाखवीत आहेत. त्यामुळे त्यांना मतदारसंघात जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. सुजय विखे आणि संजीव भोर यांच्यासह येथून राष्ट्रवादीकडून एक तगडा उमेदवार रिंगणात असेल. माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, माजी आमदार नरेंद्र घुले, आमदार अरुण काका जगताप, जिल्हा परिषदेच्या महिला-बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधाताई नागवडे किंवा तरुण दमाचे सुशिक्षित म्हणून ऐनवेळी प्रशांत गडाख यांच्यापैकी एकास शरद पवार रिंगणात उतरवतील. विखे यांनी केलेल्या दमछाकीमुळे पवार साहेब येथे स्वतः लक्ष घालण्याची शक्यता आहे. त्यामुळेच येथील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष असेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*