नागपुरात रंगणार गुरु-शिष्यची लढाई..!

लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्राच्या लक्ष्यवेधी लढतींमध्ये पहिल्या पाचात नागपूर शहर मतदारसंघाचा यंदा समावेश असेल. पंतप्रधान पदाचे दावेदार आणि सध्यच्या भाजप सरकारमधील कार्यक्षम मंत्री नितीन गडकरी हे येथून दुसऱ्यांदा विजयासाठी तयारीला लागले आहेत. त्याचा हाच विजयी रथ रोखण्यासाठी शिष्यत्व मिरवणारे माजी खासदार आणि फायरब्रांड नेते नाना पाटोळे सज्ज झाले आहे. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर मतदारसंघ पुन्हा भाजपच्या हातून जाणार की राहणार, याकडे राज्याचे लक्ष असेल.

महाराष्ट्राची उपराजधानी आणि देशाचं मध्यवर्ती ठिकाण असणारे नागपूर शहर सध्या देशातील घडामोडींचा केंद्रबिंदू आहे. संघाचे मुख्यालय असल्याने आणि देशावर आणि राज्यावर संघाला मातृसंस्था मानणाऱ्या भारतीय जनता पक्षाचीच सत्ता असल्याने नागपूर राजकीय दृष्टीने नेहमीच चर्चेचा विषय राहिलेलं आहे. लोकसभेचा बिगुल वाजल्यानंतर त्यामुळे नागपूर चर्चेत आलं नसतं तर नवलच. नागपूरमधून सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे खासदार आहेत. राजकीय क्षेत्रात मोठं नाव असलेले गडकरी २०१४ ला पहिल्यांदा थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी सलग चार वेळा खासदार राहिलेल्या विलास मुत्तेमवार यांना पराभूत करत त्यांनी दिल्ली गाठली.

संघाचं मुख्यालय आणि गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते असुनही या मतदारसंघावर यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये १९९६ वगळता काँग्रेसचाच एकहाती असा अंमल होता. गेल्या निवडणुकीत तिला छेद देण्यात गडकरी यशस्वी झाले. २०१९ च्या निवडणुकीत आता पुन्हा काँग्रेसचे हेच आव्हान गडकरी यांच्यासमोर असणार आहे. त्यांच्याकडून मतदारसंघ चमकण्याचे दावे होत असले तरी शेतकरी आत्महत्या हा विदर्भातील प्रश्न आजही सुटलेला नाही. उलट तो आणखी जटील झाला आहे. त्यामुळे विदर्भात भाजप सरकारबद्दल मोठी नाराजी आहे. नागपूरच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर राज्यांमध्ये झालेली सत्तांतरे भाजपच्या अडचणी वाढवणार्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्याच मतदारसंघातुन निवडून येत असल्याने नितीन गडकरी यांच्यासाठी ती जमेची बाजू असणार आहे. सोबतच नागपूर मेट्रो, रस्त्यांची होत असलेली कामे ही गडकरी यांची दावेदारी मजबूत करत आहेत. काँग्रेसने यावेळी चार वेळेस खासदार राहिलेल्या विलास मुत्तेमवार यांची उमेदवारी कापत भंडारा-गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नाना पटोले हे गडकरी यांचे शिष्य म्हणवले जातात. त्यामुळे गुरु शिष्याची ही लढाई कशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तिकिटाचा मार्ग सहज पार केलेल्या पटोले यांची खासदारकीची वाट मात्र एवढी सरळ नक्कीच नसणार आहे. अंतर्गत संघर्षात विभागलेली काँग्रेस, तिकीट घोषित होण्यापूर्वीच दलित समाजातील काही घटकांकडून तिकीट देण्यासाठी झालेला विरोध, मतदारसंघाबाहेरच असणं हे पटोलेंच्या अडचणी वाढवणारं आहे. आठ लाखांवर असणारे दलित आणि मुस्लिम मतदान हे ह्या निवडणूकीमध्ये महत्वाचे असणार आहेत. ७ लाख हलबा समाजाचे तर, आरक्षणाची मागणी करणाऱ्या धनगर समाजाचे जवळपास ४० हजार मतदान या मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात बसपा नेहमीच प्रभावी राहिलेला आहे. या निवडणुकीतही तो प्रभाव राखण्यात यशस्वी होत का हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

या सरकारच्या काळात वाढलेल्या दलित अत्याचाराच्या घटना, मुस्लिम समाज व भाजप हे विरोधी समीकरण आणि ही जातीचे समीकरण भाजपाची गणित बिगडवू शकतात. ह्या जातीय समिकरणांमुळेच वंचित आघाडी या मतदारसंघात महत्वाची भूमिका बजावेल अशी चिन्हे आहेत. वंचित आघाडी आणि बसपा या निवडणुकीत नेमकी कुणाची आणि किती मतं घेतात यावरच निवडणुकीच्या विजयाची गणित ठरणार आहेत.

लेखक : राहुल ठाणगे (राजकीय अभ्यासक) मो. 7040144341

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*