नगरमध्ये तिरंगी लढत होणार; मराठा उमेदवार एकमेकांना भिडणार

अहमदनगर :

राष्ट्रवादी काँग्रेसने नगर दक्षिणेसाठी युवा आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसचे बंडखोर डॉ. सुजय विखे यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दिग्गज पक्षांचे व घराण्यांचे हे दोन दिग्गज उमेदवार एकमेकांना भिडण्यासाठी तयार असण्यापूर्वीच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक इंजिनिअर संजीव भोर यांनी उमेदवारी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे या जागेसाठी तीन मराठा उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोपर्डी येथील दुर्दैवी घटनेमुळे राज्यात मराठा मोर्चाची ठिणगी पेटली. मराठा समाजातील वाढती गरिबी, बेरोजगारी यासह अट्रोसिटी या मुद्यांची जोड देत आरक्षणाच्या मुद्यावर राज्यभर मोर्चे निघाले. मराठा समाजाने आपली ताकद यातून दाखवून दिली. मात्र, तरीही भाजप सरकारच्या काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघालेला नाही. त्यामुळेच मराठा समाजात सत्ताधारी भाजप-शिवसेना व विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याविरोधात तीव्र संताप आहे. याच संतापला वाट करून देण्यासाठी भोर यांच्यासह काही मराठा नेत्यांनी राज्यभरात उमेदवारी करण्याची घोषणा देत तयारी केली आहे. समाजातील जागरूक घटक या सर्वांना आर्थिक सहकार्य करण्यास पुढे येत आहेत. त्यामुळे भोर यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाची ताकद वाढत आहे.

भोर तालुकानिहाय भेटी-गाठी घेत आहेत. त्याचवेळी राष्ट्रवादीने नगर शहरातील आमदार जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचे कार्यकर्ते त्यानुसार कामाला लागले आहेत. तर, डॉ. विखे यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याने विखे गट वेगाने सूत्र हलवीत आहेत. अशा पद्धतीने नगरच्या जागेसाठी यंदा तीन मराठा उमेदवार एकमेकांना भिडणार आहेत. यापैकी कोणाचा विजय होतो आणि कोण तिसऱ्या क्रमांकावर फेकला जातो, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*