‘राजाभाऊ’ची आठवण येतेय, कारण…

लोकसभा निवडणूकच्या तारखांची घोषणा होऊन आठवडा झालाय. देशासह महाराष्ट्र व नगरमध्ये यावरून घमासान पेटले आहे. नगरमध्ये आघाडीची जागा राष्ट्रवादीच्या, तर युतीची जागा भाजपच्या वाट्याला आहे. या दोन्ही पक्षांच्या उमेदवारीचा घोळ जवळपास मिटलाय. चित्र स्पष्ट आहे, पण फक्त निवडणुकीचे. नगर दक्षिण या कोरडवाहू भागाचे भविष्य काय, याचे कोडे उलगडत नाही. असे कोडे न उलगडल्याने राजाभाऊ तुमची आठवण आल्याशिवाय राहतही नाही. कारण…

विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपवासी होत नगरसह महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलंय. काही महिन्यांपासूनच येथील राजकारणात विविध अतर्क्य आणि सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात नसलेल्या घडामोडी घडताहेत. जनता यावर चर्चाही करतेय. पण कोणालाही त्यात काहीच समजेनासे झालंय. तरीही सगळ्यांना वाटतं की आपल्याला सगळेच समजत असून, राजकारण म्हणजे आपल्याच आवाक्यातील घोळ आहे.

अशा परिस्थितीत मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व मीडिया व लोकांच्या केंद्रस्थानी असणारे माजी आमदार स्व. राजीव राजळे अर्थात लोकांचे लाडके राजाभाऊ यांची येथील लोकांना आठवण येत आहे. तरूणाई सोशल मीडियावर, तर ज्येष्ठ नागरिक गावाच्या कट्ट्यावर राजाभाऊच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

उच्चशिक्षित असणाऱ्या या नेत्याने कधी स्वतःच्या उच्चशिक्षणाचा बडेजाव मिरवला नाही. किंवा मी उच्चशिक्षित आहे या एका निकषावर उमेदवारी मागितली नाही. मतदारसंघातील विकासाबाबत स्पष्ट ‘व्हिजन’ मांडून त्यावर काम करण्याची एक संधी देण्याची मागणी येथील जनतेकडे त्यांनी केली. त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. स्वकीयांशी दोन हात करावे लागले. स्व-पक्षातीलच प्रस्थापित पुढाऱ्यांनी लाटेच्या नावाखाली काटे पसरवले. यामुळे एक हरहुन्नरी, कर्तबगार, अष्टपैलू लोकप्रतिनिधीला आपला नगर जिल्हा कायमचा मुकला.

सध्या फक्त तो बाहेरचा, तो असा, तो तसा, अशी चिखलफेक केली जातेय. कोण कोण शिक्षणाच्या क्रेडिटवर उमेदवारी मागतंय, तर कोण जातीच्या.. येथील लोकांच्या समस्या, प्रश्न कशाप्रकारे सोडवता येतील, यावर बोलायला कोणालाच सवड नाही.

राजाभाऊ मात्र महाविद्यालयात तरुण मित्रांसमवेत ‘चाय पे चर्चा’ करत त्यांच्याशी जितका मनमोकळा संवाद साधत तितकाच रानात शेतकऱ्यांबरोबर चटणी-भाकर खात त्यांच्या व्यथा जाणून घेत. दुसरीकडे उद्योजकांबरोबरही त्याच सहजतेने विविध समस्यांवर विचारविनिमय करत. संगीत, साहित्य, कला, क्रीडा, सिनेमा या क्षेत्राची आवड जोपासनारा, अभ्यास असणारा व ही सांस्कृतिक चळवळ वाढवणारा, जोपासणारा हा नेता होता. ‘नेता नव्हे मित्र’ अशी साद घालणाऱ्या राजाभाऊची आठवण आत्ताच्या रणधुमाळीत त्यामुळेच लोकांना अस्वस्थ करून जात आहे. आणि जनताही नको त्या मुद्यांवर सुरू असलेल्या गुऱ्हाळात गतिमंद झाली आहे. जसा नगरच्या दक्षिण भागाचा विकास मंदावलाय ना, अगदी तशीच…

लेखक : संतोष शिंदे, सामजिक व राजकीय अभ्यासक, अहमदनगर

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*