भाजपने टाकला डाव ‘कुल’; राष्ट्रवादी निघाली वेगात फुल..!

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आमदार पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी, महादेव जानकरांचा पत्ता कट

यंदा अनपेक्षितपणे कांचन कुल यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात रिंगणात उतरवून भाजपने राष्ट्रवादीला कुल (शांत) राहून काटशह दिला आहे. हे खरे असले तरी ज्येष्ठ नेते शरद पवार व बेरकी राजकारणी अजित पवार यांच्यासह एकूणच राष्ट्रवादी यामुळे आणखी जोमाने प्रचारात फुल ताकदीने उतरणार असेच चित्र आहे.

2014 च्या निवडणुकीत महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना काटे की टक्कर दिली होती. पण त्यानंतर मात्र जानकर हे कधीही मतदारसंघात फिरकले नाहीत. यावेळी ते बारामती मतदारसंघात लढणार होते पण ते रासपच्या तिकीटावर लढणार होते आणि भाजपची ईच्छा होती की त्यांनी भाजपचे झेंडा हाती घ्यावा.

मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राहूल कूल हे भाजपमधे प्रवेश करणार होते पण त्यावेळी जानकरांनी दौंडमधून मोठे लीड घेतल्यामुळे त्यांनी रासपची उमेदवारी घ्यावी असा प्रस्ताव भाजपने ठेवला. अशीही रासप आणि भाजपची युती आहे त्यामुळे राहूल कूल हे रासपचे तिकीट घेत आमदार झाले.

भाजपने केली जानकरांची कोंडी
रासप चे तिकीट घेऊन निवडून आलेले आ.राहूल कूल यांच्या पत्नी मात्र भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर लढणार आहेत. आता महादेव जानकर यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आपल्या पक्षाच्या आमदाराची पत्नी आहे म्हणून पाठबळ देणार की भाजपने जानकरांना तिकीट नाकारले म्हणून राग काढणार असा प्रश्न जानकरांसमोर आहे. महादेव जानकर यांच्या भुमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे.

सुरूवातीला ही उमेदवारी राहूल कूल यांच्या आई रंजनाताई कूल यांना देणार होते. परंतू ऐनवेळी पत्नी कांचन कूल यांना उमेदवारी देण्यात आली.

काय असतील आव्हाने आणि काय होतील परिणाम :
1 – आरक्षणाचे आश्वासन पूर्ण न केल्यामुळे धनगर समाज भाजपवर नाराज.
2 – सुप्रियाताईंचे मतदारसंघात चांगले काम.
3 – कांचन कूल या राजकारणात नवख्या आहेत आणि पहिल्यांदाच थेट लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
4 – महादेव जानकरांची भुमिका काय आहे यावरही बरेचसे चित्र स्पष्ट होईल.
5 – जानकरांचे कार्यकर्ते भाजपवर नाराज आहेत तशी स्पष्ट मोहीम त्यांनी उघडली आहे. उलटे कमळ असलेले फोटो सोशल माध्यमातून फिरत आहेत.
6 – पुढची विधानसभा निवडणुक आ.राहूल कुल हे भाजपच्या चिन्हावर लढणार अशी माहिती सुत्रांकडून समजली आहे. त्यामुळे जानकर तटस्थ राहिल्यास सुप्रियाताईंना फायदा होऊ शकतो.

एकेकाळी शरद पवारांचे लाडके राहूल कूल हे पवारांच्या मुलीविरोधात स्वतःच्या पत्नीला ऊभे करत आहेत. राहूल आणि कांचन यांचे लग्न अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी जमवले होते. कांचन कूल आणि सुनेत्रा पवार या जवळच्या नातेवाईक आहेत.

लेखक : विनोद सूर्यवंशी (सामाजिक-राजकीय अभ्यासक)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*