नगर जिल्ह्यात होणार आणखीही उलथापालथी..!

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर सध्या देशभरात वेगवान घडामोडी घडत आहेत. अनेकजण पक्षबदल करून आपापले स्थान पक्के करीत आहेत. तर, काहीजण दुसऱ्यांची कोंडी करून आपली कोंडी फोडत आहेत. नगरमध्येही सध्या अशाच आतल्या घडामोडींना उधान आले आहे. सध्या एकीकडे दिसणारे दुसऱ्याच गोटाशी संधान बांधून आहेत. त्यामुळेच पुढील चार-पाच दिवसांत नगरमध्ये मोठ्या उलथापालथी होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुत्राने बंडखोरी करून भाजपतर्फे उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. विखे पाटील पिता-पुत्र दोन वेगवेगळ्या पक्षात असल्याने एकूणच नगरकर संभ्रमात आहेत. विखे पाटलांनी पुत्रासाठी गोपनीय बैठका घेत प्रचार सुरू केल्याचेही फोटो व्हायरल झालेले आहेत. तर, आमदार शिवाजी कर्डिले यांच्या रोहिदास व देविदास या दोन्ही पुतण्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नगरात मुक्काम करून इतरही काहीजणांना आपलेसे केले आहे. तर, कॉंग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार डॉ. सुजय विखेंच्या गोटात सामील झाले आहेत.

सध्या येथे कागदावर राष्ट्रवादी खूप बलशाली आहे. मात्र, काँग्रेसची स्थिती नाजूक आहे. तर, भाजप बलवान असूनही एकमेकांवर विश्वास नसल्याने व डॉ. सुजय यांच्या उमेदवारीला विरोध असल्याने दुभांगाल्याची स्थिती आहे. शिवसेना मात्र आपल्या जागेवर ठाम आहे. अशावेळी भाजप व राष्ट्रवादीमधील अनेकजण कोंडी फोडण्यासाठी म्हणून पक्षांतर करण्यासाठी तयार झाले आहेत. अनेकांनी पवार साहेबांकडे तर, काहींनी भाजपकडे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क करीत आपले बस्तान बसविण्याची चाचपणी केली आहे. पुढील चार दिवसांत याचे चित्र स्पष्ट होऊन भाजप आणखी बलशाली होण्याचा दावा कार्यकर्ते करीत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*