वैशालीताई, तू सोडून आम्ही सगळे येडेच की..!

लोकसभा निवडणुकीत कोणाला, कुठून, कोणाच्या विरोधात उमेदवारी मिळालीय.. कोण कोणाला मदत करून निवडून आणणार.. कोण हवेत गेलाय आणि कोण मातीत जाणार.. कोण खासदार आणि पंतप्रधान होणार.. काँग्रेस येणार की भाजप.. राहुल गांधींचे काय होणार.. मोदी-शाह जोडीला देश पुन्हा संधी देणार का.. मंदिर होणार का..?

हे आणि असलेच प्रश्न सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आहेत. पण यात माझा शेतकरी, कष्टकरी आणि राबणारी महिला कुठेच नाही. खंत वाटते की, ज्यांच्या तळहातावर हा देश उभा आहे, धावतो आहे, पाळतो आहे, जिद्दीने लढतो आहे त्या शेतकरी-कष्टकऱ्यांना लोकशाहीच्या उत्सवातही काहीच स्थान नाही..! नव्हे आम्हा पमारांना ते स्थान मिळविण्याची इच्छाच नाही..! जाती, धर्म, प्रांत आणि बेगडी राष्ट्रवाद यांच्या दुर्दैवी फेऱ्यात माझा भारत अडकलाय. त्याचा पोशिंदा आपल्याच मरणाची चिता रचतोय आणि आम्हाला कुठेही आशेचा किरण दिसत नाही…

होय, नव्हता दिसत या महाराष्ट्रात तरी असा पेटलेला दिवा. पण ती पणती आता पेटलीय. लोकशाही टिकविण्यासाठी आणि शेतकरी-कष्टकरी जनतेला प्रकाशवाट दाखविणारी ही पणती सध्या यवतमाळ-वाशीम मतदारसंघात पेटलीय. तिचे नाव आहे वैशालीताई सुधाकर येडे..!

आतापर्यंत हजारो ‘सुधाकर’ या मातीत राबताना व मातीसाठी लढतानाही दखलपात्र न ठरल्याने कुटुंबाला सोडून गेले. अनेकींनी त्यामुळे हाय खाल्ली. या कोडग्या व्यवस्था आणि यंत्रणेला तरीही जाग आली नाही. कारण त्यांनी झोपेचं सोंग घेतलंय. पण माझी वैशालीताई शेतकरी नवऱ्याच्या आत्महत्येने खचली नाही. उलट पेटून उठली. येड्यांच्या आणि अन्याय सहन करणाऱ्या अतिशहाण्यांच्या जगात तीच तर लोकशाहीची मार्गदर्शक बनली आहे. पैशावर निवडणुका करण्याच्या काळात ती पुरुषप्रधान व्यवस्थेत पदर खोचून लोकभावनेच्या भांडवलावर उभी ठाकली आहे. खरा पुरुषार्थ (महिलांची माफी मागते. कारण त्यातही पुरुष म्हणजे महान असे मला म्हणायचे नाही. दोघेही समान असून फक्त वाक्प्रचार म्हणून हा शब्द वापरला आहे) काय असतो तो वैशालीताई हिने यातून दाखवून दिला आहे.

वैशालीताई कोण हे पहिल्यांदा टीव्हीवर पाहिलं ते मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात. नवरा व्यवस्थेपुढे हतबल झाल्यावर शेवटच्या पर्यायावर गेल्याचा अनुभव घेतलेली वैशाली स्टेजवरून जगण्याचा संदेश देत होती. तिचा शद्ब न शब्द अजूनही आठवतोय. त्यावेळी तिच्या जिद्दीला सलाम करताना माझ्याही डोळ्यात पाणी येत होतं. त्यावेळी दिसलेली वैशाली सुधाकर येडे म्हणजे आताची वैशालीताई…

नवऱ्याची आत्महत्या किंवा निधनानंतर खचलेल्या आणि समाजाच्या वाईट नजरेला सामोरे जाताना वैतागलेल्या हजारो बायका आम्ही पाहतोय. काहीजणी त्यातूनही धीराने उभ्या राहिल्याची उदाहरणे आहेतच की. पण वैशालीताई तू खचली तर नाहीस उलट दुसऱ्यांना उभारी देण्यासाठी नाटक या एका सक्षम माध्यमातून अनेकांच्या जीवनातील दुवा बनलीस…

साहित्य संमेलनामुळे तुझी ओळख झाली. मी आणि माझ्या नवऱ्याने आतापर्यंत अनेकदा आमच्या कौटुंबिक चर्चेत तुला सलाम केलाय. आमची प्रेरणा आहेस तू. आता तू देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढतेय. शेतकरी-कष्टकरी व गरिबांचा आवाज तू बनली आहेस. तू लढत असतानाही आम्ही बावळे कोणाचेतरी भक्त किंवा अंध विरोधक म्हणूनच मिरवतोय. लोकशाही आणि सामाजिक व्यवस्था मोडीत काढणाऱ्या गुंड, पुंड आणि माथेफिरू यांनाच कैवारी समजतोय…

तू जिद्दीने या अन्यायाचा बिमोड करायला लोकशाहीच्या उत्सवात उभी ठाकली आहेस. तू त्यात जिंकणार की नाही, हा मुद्दाच गौण आहे. ताई, अनेकांना तू जीवनाची प्रेरणा बनली आहेस. तू लढली, जिंकली म्हणून काही जादूची कांडी फिरवल्यागत शेतकरी व कष्टकरी जनतेच्या समस्या मिटणार नाहीत. पण रडत न बसता लढण्याची उर्मी त्यामुळे आम्हाला नक्की मिळणार आहे की. त्यामुळेच तुला जिंकण्यासाठी शुभेच्छा देण्याची गरज नाही. एसटी बसमधून जिल्ह्याच्या गावाला अर्ज घेण्यासाठी जातानाच तुझा विजय झाला आहे. कारण कोडग्या व्यवस्थेला तू लाथ मारून लोकसहभागाच्या जीवावर या लढाईत उतरली आहेस. आमदार बच्चू कडू भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तू भामट्या व फेकाडपंथी राजकीय व्यवस्थेवर प्रहार केला आहेस. राज्यभरातून तुला आर्थिक व मानसिक धीर अनेकजण देत आहेत. हाच तर तुझा आणि या लोकशाही व्यवस्थेचा खरा विजय आहे. म्हणूनच तुला जोमाने लढण्याच्या शुभेच्छा…

माधुरी सचिन चोभे,
प्रकाशक, कृषीरंग
(मो. 8275438173)

*प्रस्तुत लेख कॉपी पेस्ट करून वापरू नये. लेखकाचे नाव न काढून आपल्याच नावावर कोणीही खपवू नये.

**कृपया, निवडणूक आचारसंहिता सुरू आहे. हा लेख त्यात बसविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. एका लढवय्या महिलेला लोकशाही वाचविण्यासाठीची लढाई लढताना पाहून उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून हे लेखन केले आहे.

***पेड न्यूज नावाचा गैरप्रकार कृषीरंग करीत नाही.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*