निवडणूक प्रचारात निरर्थक मुद्दे अग्रक्रमावर..!

अहमदनगर :

देशातील वाढती बेरोजगारी, आरोग्याची दुरवस्था, वाढती गरिबी, बिघडलेली सामाजिक स्थिती, महिलांचे प्रश्न, तरुणांच्या समस्या व देशातील विज्ञान-तंत्रज्ञान युगाच्या पुढील आव्हाने हे महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारीत धार्मिक राष्ट्रवाद व मंदिर-मस्जिद-चर्च आदींचे भावनिक राजकारण याच कमी महत्त्वाच्या किंवा निरर्थक मुद्द्यांना लोकसभा निवडणुकीतील प्रचारात अग्रक्रम मिळाला आहे. त्यामुळे यंदासुद्धा ही निवडणूक विकासाच्या मुद्यापासून पूर्णपणे बाजूला गेल्याचे चित्र आहे.

पुलवामा या दुर्दैवी दहशतवादी हल्ल्याचा राजकीय कारणासाठी वापर करण्याची खेळी यंदा प्रचारात जोमात आहे. भाजपच्या छोट्या-मोठ्या नेत्यांनी याच मुद्द्यावर भर देते देशाला आमच्या खमक्या चौकीदाराची कशी गरज आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातील राजकारण त्यामुळे सध्या पाकिस्तान केंद्रित झाले आहे. देशातील जनतेच्या समस्या सोडण्याबद्दल आपण काय करणार यावर भाजपा किंवा त्यांचे नेते ठोसपणे काहीही बोलत नाहीत. त्याचवेळी काँग्रेसही पुन्हा एकदा गरिबीच्या मुद्याला हातात घेताना आर्थिक विकासावर आपण काय करणार याबद्दल सांगण्यात अपयशी ठरली आहे. नोटबंदी व जीएसटी या दोन्हीमुळे देशाची अर्थव्यवस्था जर्जर झालेली असताना तिला उभारी कशी देणार यावरच सत्ताधारी भाजप, मित्रपक्ष व काँग्रेस आघाडी आणि विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी बोलणे गरजेचे होते. मात्र, सर्व पक्ष आर्थिक मुद्द्यावर बोलण्यास निरुत्साही आहे. काँग्रेसही त्यातून ठोस काही देण्यात कमी पडत आहे. त्यामुळे यंदाची निवडणूकही विकास या मुद्याऐवजी भावना व निरर्थक मुद्दे त्यांच्याभोवती केंद्रित झाली आहे हे देशाचे दुर्दैव म्हणायला हवे…

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*