‘न्याय’ देण्याचा भाजपच्या जाहीरनाम्यात ‘संकल्प’..!

काँग्रेसने जाहीरनाम्यात शेतकरी, महिला व तरुणांना आश्वस्त करण्यात यश मिळविले असल्याचे दिसताच सत्ताधारी भाजपाला लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हा देश शेतकऱ्यांचा असल्याचे भान आले आहे. मागील वेळी हमीभावसह शेतकरी वर्गाला अच्छे दिन दाखविणाऱ्या या भाजपने 75 ‘संकल्प’ करीत शेतकऱ्यांना ‘न्याय’ देण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

राष्ट्रवाद, दहशतवाद, धर्म, राम मंदिर अशा मुद्यांवर निवडणूक नेण्यासाठी भाजप प्रयत्नशील होता. मात्र, न्याय योजनेत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 72 हजार रुपये देण्याची महत्वपूर्ण घोषणा करीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाला जमिनीवर आणले. शेती-मातीच्या मुद्यावर ही निवडणूक आणण्यात काँग्रेस यशस्वी झाली. त्यामुळे निवडणूक पाकिस्तान केंद्रित न राहता शेतकरी-कष्टकरी केंद्रित झाली. त्याचेच पडसाद भाजपाच्या जाहीरनाम्यात दिसले आहेत.

शेतकरी वर्गाला पेन्शन देण्याची मोठी घोषणा त्यात केली आहे. मात्र, त्या योजनेतून पेन्शन किती मिळणार व नेमके कोणाला त्यातून गाळले जाणार, याबाबत स्पष्टता नाही. भाजपने यापूर्वीच अनेक योजना जाहीर करताना जाचक अटी-नियम लागू केले. त्यामुळेच शेतकरी कर्जमाफी असोत की नुकसान-भरपाई यात शेतकरी आपण नेमके कोणत्या वर्गात याचेच कोडे सोडविण्यात अपयशी ठरला. शेजारी एकाला योजनेचा लाभ मिळत असताना त्याच आर्थिक व सामाजिक क्षमतेचा दुसरा शेतकरी डावलला गेला. काहींच्या घरात डबल योजना मिळाल्या तर, काहीजण निकषात अडकून बसले.

भाजपच्या राज्यात हे कोडे पडल्याने शेतकरी वर्गात सत्ताधारी पक्षावर मोठी नाराजी दिसते. ग्रामीण भागात नाराजी, तर शहरी भागात काहीजण आनंदी असे दोन गट देशात आहेत. त्यावर उपाय म्हणून काँग्रेस व विरोधकांना पाकिस्तानी हिताचे लेबल किंवा देशद्रोहाच्या लेबलात भाजपने गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यात यश येत नसल्याने अखेरीस भाजपने पुन्हा एकदा शेतकरी राग आळवला आहे. त्याचा कितपत फायदा होतो हे निकालानंतर समजणार आहे.

– टीम कृषीरंग

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*