Blog | अर्थपूर्ण नव्हे तर निरर्थक मुद्यांवर प्रचार..!

यंदाची लोकसभा निवडणूक नेमकी कशासाठी लढली जातेय याचाच पत्ता नसल्यासारखी या देशाची स्थिती आहे. देशापुढील महत्वाचे प्रश्न व मूलभूत विकासावर कोणीही बोलत नसताना निरर्थक मुद्यांवर निवडणूक नेण्यात राजकीय पक्षांना यश आले आहे. हेच ‘अर्थ’पूर्ण यश देश कोणत्या स्थितीत आहे, हे अधोरेखित करीत आहे.

सध्या देशभरात भाजपप्रणीत लोकशाही आघाडी आणि काँग्रेसप्रणीत युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स यांच्यात जोरात लढत सुरू आहे. डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल आणि इतर काही छोटे-मोठे पक्ष तिसऱ्या आघाडीचा पर्याय बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तर, महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात आहे. सगळेच पक्ष एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करी आहेत. भाजप-शिवसेना यांनी पाच वर्षे चिखलफेक करून आता अंघोळ करीत सोवळे ल्याले आहे. राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे कपडे काढण्याची भाषा करीत आहेत. तर, विरोधक अजूनही एकमेकांशी वैरभाव टिकवून आहे. या राजकीय पक्षांच्या संपूर्ण गोंधळात देश गोंधळलेल्या स्थितीत आहे.
याच गोंधळात देशाचे प्रश्न व नागरिकांच्या मुलभूत समस्या मागे पडून तुलनेने कमी महत्वाच्या मुद्यांवर हि लोकसभा निवडणूक केंद्रित झाली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या नावावर भाजप मतदान मागत आहे. तर, शिवसेना पुन्हा एकदा हिंदुत्व हाच मुद्दा घासून-पुसून वापरीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात एक आणि गुजरातमध्ये एक अशा पद्धतीने दुटप्पी भूमिका घेऊन आहे. तर, महाराष्ट्र काँग्रेस फ़क़्त निवडणूक कधी एकदा संपते आणि आपला ‘निकाल’ लागतो, अशाच अविर्भावात आहे. देशापुढील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना पक्षसंघटना साथ देत नसल्याने बऱ्याच मर्यादा आहेत.

शेती, शेतकरी, दुष्काळ, कष्टकरी-कामगारांचे प्रश्न, महिलांची सुरक्षा, वाढती जातीय व धार्मिक असहिष्णुता यासह आरोग्य, शिक्षण, पाणी अशा मुलभूत गरजा आणि देशाचा सर्वांगीण आर्थिक व सामाजिक विकास यावर बोलायला कोणालाही फुरसत नाही. काँग्रेसने न्याय देण्याचा नारा देत गांधींच्या नेतृत्वाखाली काहीअंशी प्रयत्न सुरू ठेवले आहेत, तेच काहीतरी दिलासादायक आहे. नाहीतर भाजप हि निवडणूक पाकिस्तानच्या विरोधात लढत असल्याच्या अविर्भावात आहे.
यापूर्वी काँग्रेसने केलेल्या चुका लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस कितपत यश मिळवेल याबाबत साशंकता आहे. तर, भाजप किती जागा गमावणार हाच प्रश्न आहे. एकूणच निवडणूक निकालानंतर देशाची गोंधळलेली स्थिती सुधारेल असेही चित्र नाही. प्रचारात मुलभूत समस्या बाजूला सारून भावनिक अनागोंदी माजविणाऱ्यांना जनता कशी धडा शिकवते, यावर देशाचे भविष्य ठरणार आहे.

@ सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*