‘तोंडकरां’ना ऊर्मिला पुरून उरणार का?

मुंबई :

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कटशह देण्यासाठीचा प्रयत्न खासदार गोपाल शेट्टी यांचे कार्यकर्ते सरसावले आहेत. उर्मिला यांच्या सभेत तोंडात दम आणून काही कार्यकर्ते ‘मोदी..मोदी…’चा जयघोष करीत आहेत. हे कार्यकर्ते कोणत्या पक्षाचे आहेत, त्यावरून उलटसुलट आरोप केले जात आहेत. त्यामुळेच त्या ‘तोंडकरां’ना उर्मिला पुरून उरणार की हरणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयघोषात उर्मिला यांच्या सभा व प्रचार रॅली उधळून लावण्याचे प्रयत्न होत आहेत. भाजपचे उमेदवार बॅकफूटवर गेल्याने हा प्रकार निराशेच्या भावनेतून केला जात असल्याचा दावा काँग्रेसचा आहे. तर, काँग्रेस कांगावा करीत असल्याचा दावा खासदार शेट्टी यांनी केला आहे. त्यातील खरेखोटे काही अजूनही पुढे आलेले नाही. मात्र, उर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीची गंभीर दखल सत्ताधारी भाजपला घ्यावी लागली आहे हे निश्चित, दिसत आहे.

उर्मिला यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्यावर उर्मिला यांच्या आंतरधर्मीय लग्नाचे प्रकरण उकरण्यात आले आहे. वैयक्तिक चिखलफेक करण्याचे काही प्रयत्न होत आहेत. त्यावर उर्मिला यांनी लोकशाही व धर्मनिरपेक्ष व्यवस्था यावर विश्वास व्यक्त करीत प्रचारात झोकून दिले आहे. येथे भाजपची ताकद मोठी आहे. मात्र, मराठी भाषेत उर्मिला यांनी मतदारांना साद घालीत प्रचाराला संवादाच्या पातळीवर आणले आहे. त्यातून त्यांना विजय मिळतो की पराभव होतो, याकडे देशाचे लक्ष असणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*