नगरवर फडणवीसांच्या टीमचे विशेष लक्ष

अहमदनगर :

यंदा पुन्हा एकदा जास्तीतजास्त खासदार निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील काही मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नगर व सोलापूर हे त्यातील महत्त्वाचे मतदारसंघ आहेत.

नगरची व सोलापूरची जागा सध्या भाजपकडेच आहे. या दोन्ही जागा कायम राखण्यासाठी फडणवीस यांनी विशेष टिममार्फत त्यावर लक्ष ठेवले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आहेत. म्हणून नगरमध्ये विशेष पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. आमदार, पदाधिकारी व भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांच्या संशयास्पद हालचालीवर ही टीम लक्ष ठेवणार आहे. तसेच निकालानंतर पक्षनिष्ठेची गोळाबेरीज तपासली जाणार आहे.

नगरमध्ये खासदार दिलीप गांधी यांच्या गटाची नाराजी आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या गटाकडून जावई व राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना मदत केली जाणार असल्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. गांधी व कर्डीले यांनी पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचेच काम करण्याची जगजाहिर ग्वाही दिलेली आहे. तरीही अशावेळी दगाफटका नको, आणि तसे झाल्यास त्यानुसार धोरण ठरविण्यासाठी म्हणून नगर तालुका, शहर व सर्वच मतदारसंघात फडणवीस यांची टीम त्रयस्थपणे लक्ष ठेऊन आहे. सोलापुर शहरातही अशाच पद्धतीने टीम फडणवीस काम करीत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*