विखे यांची राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका

अहमदनगर :

लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला फक्त एकच दिवस बाकी असताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. पुणे जिल्ह्यातील नेत्यांची नावे न घेताही जोरदार टीका करीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अकडेवारीसह टीका केली आहे. त्यांनी जारी केलेले प्रसिद्धीपत्रक जसे आहे तसेच कृषीरंग प्रकाशित करीत आहे. यास राष्ट्रवादी कशी उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रसिद्धीपत्रक असे :

जिल्हृयातील कुकडी प्रकल्पाखाली येणा-या शेतक-यांना हक्काच्या पाण्यापासुन वंचित ठेवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रस्थापित नेतृत्वाकडुन होत आहे. राजकारणासाठी जिल्ह्यातील पाणी प्रश्नाचा सोईने वापर करुन हा जिल्हा भकास करण्याचे कारस्थान त्यांचे अनेक वर्षांपासुन सुरु असुन, जिल्ह्याबाहेरील या अतिक्रमणाला आता लोकांनीच नाकारायचे ठरविले आहे. त्यामुळेच पक्षिय राजकारणा पलिकडे जावून हक्काच्या पाण्याचा संघर्ष भविष्यात उभा करावा लागेल. व्यक्तिगत राजकीय भविष्यापेक्षा जिल्ह्याच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविणे हाच माझा प्राधान्यक्रम आहे.

कुकडी समुहात 30 टिएमसी पाण्यापैकी कुकडीच्या डाव्या कालव्याला अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यालाही एकुन 20 टिएमसी पाणी मिळणे अपेक्षित आहे. यात नगर जिल्ह्याला 15 टिएमसी व सोलापूरलाही 5 टिएमसी पाण्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मात्र सद्यस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या वाट्याला आलेले 15 टिएमसी पाणीही मिळत नसल्याकडे विरोधी पक्षनेत्यांनी लक्ष वेधले.

अहमदनगर जिल्ह्याला पाणी न मिळू देण्याचे षडयंत्र गेल्या अनेक वर्षांपासुन पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे नगर जिल्ह्यातील शेती क्षेत्र उध्वस्त झाले असून, नगरच्या विकासाची प्रक्रीया खुंटली आहे. रोजगारासाठी युवकांचे वाढत चाललेले स्थलांतर चिंतेची बाब बनली आहे मात्र या प्रश्नाकडे सोईनूसार दुर्लक्ष करीत पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी या भागाला केवळ पोकळ आश्वासने दिली, खोटी स्वप्ने दाखविली असे स्पष्ट करुन त्यांनी सांगितले की, लोकनेते स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करुन, या भागाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
कुकडी प्रकल्पाच्या सर्व कालव्यांचे आवर्तन समान पध्दतीने होणे अपेक्षित आहे परंतू अहमदनगर जिल्ह्याला पाणी येणा-या डाव्या कालव्यास पाणी कमी दिले जाते व इतर कालवे पुणे जिल्ह्यात असल्याने त्यांना जास्त पाणी दिले जाते. शिवाय धरणातील पाणी थेट नद्यांना सोडून कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बेकायदेशिरपणे भरुन घेतले जातात. साठविलेले पाणी नदीत सोडण्याची प्रकल्प अहवालात तरतुद नसतानाही ते कसे सोडले जाते? या मागे कोणाचे स्वार्थी राजकारण आहे? असा सवाल ना.विखे पाटील यांनी उपस्थित केला.

पुणे जिल्ह्यातील नेत्यांच्या दबावाखाली असलेले जिल्ह्यातील कोणतेही नेते आज या हक्काच्या पाणी प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. नगरला हक्काचे पाणी मिळणे, हा मुद्दा सत्तेच्या राजकारणापेक्षा व्यापक आणि नगरकरांच्या जिविताशी जोडलेला आहे. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असुन, प्रत्येक हंगामानंतर डाव्या कालव्यात नगर जिल्ह्यातील शेतीसाठी पाणीही शिल्लक ठेवले जात नाही. उरलेले तुटपूंजे पाणी केवळ पिण्यासाठी दिले जात असल्याचे दाखवून बोळवण केली जात असतानाही या नेत्यांच्या ताटाखालचे मांजर होवून बसलेले जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते मात्र याबाबत शब्दसुध्दा काढायला तयार नाही हे दुर्दैवी आहे. आज नगर जिल्ह्याला पोलिस बंदोबस्तात पाणी आणावे लागते ही परिस्थिती नेमकी कुणाच्या आदेशामुळे निर्माण होते हे आता लपून राहीलेले नाही. जिल्ह्यावर हा एक प्रकारे अन्यायच असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.

कुकडी डावा कालवा व घोड कालवा यांची आपल्या नगर जिल्ह्यातील पाण्याची वानवा असताना हा ज्वलंत प्रश्न बाजुला ठेवून कर्जत, जामखेड,श्रीगोंदा, पारनेर भागात आम्ही खुप सेवा करत आहोत असे दाखविण्याचा सुरु असलेला प्रयत्न हा केवळ जनतेची दिशाभूल करणारा असून, नगर जिल्ह्यातील जनतेची केवळ पुणे जिल्ह्यातील नेत्यांनी थेट फसवणूक केली हे आता उघड झाले आहे. कृष्णा खो-याच्या अंतर्गत असलेल्या पाथर्डी तालुक्यालाही ही मंडळी पाणी मिळू देत नाहीत, त्यामुळेच विविध कारणाने जिल्ह्यात येवून पाणी प्रश्नांवर भाष्य करणा-या नेत्यांची कृती हे बेगडी प्रेम दर्शवते.

या ज्वलंत पाण्याच्या प्रश्नाकडे पक्षीय राजकारणा पलिकडे जावून आता पाहण्याची वेळ आली असून,हक्काच्या पाण्याची लढाई ही आता स्वाभिमानाची झाली असून, पक्षभेद विसरुन या पाण्यासाठी एकत्रित येण्याची आता गरज आहे. माझ्या राजकीय भवितव्याची कोणतीही तमा न बाळगता खासदार साहेबांनी सुरु केलेली ही पाण्याची लढाई मी कोणतीही तमा न बाळगता पुढे नेणार आणि पाण्याच्या प्रश्नापायी नगर जिल्हा उध्वस्त करणा-यांना धडा शिकविणार असल्याचा त्यांनी इशारा दिला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*