रेशनवरच्या तूर डाळीत चरतात सोंडे..!

अहमदनगर :

महाराष्ट्रात मानवी आहारात मका खाल्ला जात नसतानाही तो रेशनवर देण्याचे औदार्य दाखविणाऱ्या मायबाप सरकारच्या तूर डाळीमध्ये आता सोंडे मोकाट फिरत आहेत. अशीच मोकाट चरणाऱ्या सोंड्याची डाळ शिधापत्रिका धारकांच्या माथी मारली जात आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबद्दल माहिती देताना लाभार्थी सुधीर चोभे (रा. बाबुर्डी बेंद, ता./जि. अहमदनगर) यांनी सांगितले की, सरकारी अनास्था आणि अनागोंदी यांचा आपलाच विक्रम प्रत्येकवेळी महसूल विभाग तोडत असल्याचे चित्र महाराष्ट्र राज्यात आहे. महाराष्ट्र शासन ऐवजी शोषण असेच मिरवणारे हे डिपार्टमेंट रेशनवर काही जीवनावश्यक वस्तू माफक किमतीत देत असल्याचा दावा करते. मात्र, सध्या रेशनवर दिली जाणारी तूर डाळ खाण्यासाठी कितपत योग्य आहे हेच तपासण्याची गरज आहे. रेशन दुकानदार अशीच सोंडे असलेली डाळ घेऊन जाण्याची सक्ती करीत आहेत. डाळ घेतली तरच इतर वस्तू दिल्या जातात. मात्र, ही डाळ निकृष्ठ आहे. त्याबद्दल गावातील समितीकडे तक्रार करूनही विशेष उपयोग होत नाही. डाळीत मोकाटपणे सोंडे चरत आहेत. सरकारी अनास्थेचे सोंडे महाराष्ट्रात असेच फिरत असल्याने सामान्य जनता न्याय कोणाकडे मागणार?

सरकारी तूर डाळीच्या पाकिटांची विक्री होत असल्याच्याही बातम्या अनेकदा येतात. मात्र, आता हीच तूर डाळ खाण्यास योग्य की अयोग्य असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. महाराष्ट्र सरकारच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे ही डाळ रेशनवर वितरीत केली जात आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन लिमिटेड, मुंबई यांच्या डाळीच्या काही पाकिटांमध्ये चांगली तर, काहींमध्ये सोंड्यानी खाल्लेली डाळ मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच व्यक्तिगतरीत्या लक्ष घालण्याची मागणी चोभे यांनी केली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*