समजून घ्या स्वाईन फ्ल्यूचा प्रतिबंध व नियंत्रण मार्गदर्शक

सन 2009 मध्‍ये साथ स्‍वरुपात आलेला इन्‍फल्‍यूएंझा ए एच 1 एन 1 विषाणू हा आता आपल्‍या वातावरणाचा अविभाज्‍य भाग झाल्‍याने सिझनल फ्ल्‍यू प्रमाणे वर्तन करीत आहे. या फ्ल्‍यू विषाणूमध्‍ये असलेल्‍या जनुकीय लवचिकतेमुळे नवनवे विषाणू रुपही विकसित होताना दिसते आहे. या पार्श्‍वभूमीवर आपण सर्वांनी क्षेत्रीय पातळीवर इन्‍फल्‍यूएंझा प्रतिबंध व नियंत्रण उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्‍याची गरज आहे.

इन्‍फल्‍यूएंझा संदर्भात जिल्‍हास्‍तरीय नोडल अधिकारी म्‍हणून जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक कार्यरत आहेत. सक्षम सर्वेक्षणासाठी जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक आणि जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांच्‍या समन्‍वयाने काम करण्‍यात येत आहे. तसेच इन्‍फल्‍यूएंझा प्रतिबंध व नियंत्रण संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन क्षेत्रीयस्‍तरावर होणार आहे. स्‍वाईन फ्ल्‍यू या विषयीची सविस्‍तर माहिती भारत सरकारच्‍या आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण मंत्रालयाच्‍या http://mohfw.gov.in या वेब साईटवर उपलब्‍ध आहेत.

इन्‍फल्‍युएंझा ए एच 1 एन 1 टाळण्‍यासाठी हे करा – वारंवार साबणाने व स्‍वच्‍छ पाण्‍याने हात धुवावेत, पौष्टिक आहार घ्‍यावा, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्‍या पालेभाज्‍या या सारख्‍या आरोग्‍यदायी पदार्थाचा आहारात वापर करावा. धुम्रपान टाळावे, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्‍यावी व भरपूर पाणी प्‍यावे.

इन्‍फल्‍युएंझा ए एच 1 एन 1 टाळण्‍याकरता हे करु नका – हस्‍तांदोलन, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्‍टरांच्‍या सल्‍याशिवाय औषध घेऊ नका, आपल्‍या फ्ल्‍यू सदृश्‍य लक्षणे असतील तर गर्दीच्‍या ठिकाणी जाऊ नका.

सर्वसाधारण लोकांनी मास्‍क वापरण्‍याची आवश्‍यकता नाही. चुकीच्‍या पध्‍दतीने दीर्घकाळ मास्‍क वापरल्‍याने तसेच मास्‍कची चुकीच्‍या पध्‍दतीने विल्‍हेवाट लावल्‍याने संसर्ग वाढण्‍याची भिती असते. त्‍यामुळे सर्वसामान्‍य जनतेने घडीचा रुमाल वापरणे अधिक योग्‍य आहे.

स्वाईन फ्ल्‍यू रुग्‍णाची घरगुती काळजी – बहुतांश फ्ल्‍यू रुग्‍ण हे सौम्‍य स्‍वरुपाचे असतात. त्‍यांना रुग्‍णालयात भरती करण्‍याची आवश्‍यकता पडत नाही. त्‍यामुळे अशा फ्ल्‍यू रुग्‍णांची घरी कशी काळजी घावी हे माहिती असणे आवश्‍यक आहे. घर मोठे असेल तर रुग्‍णाकरिता वेगळी खोली निश्चित करावी. रुग्‍णाने शक्‍यतो बैठकीच्‍या खोलीत , ज्‍या ठिकाणी सर्व कुटूंबीय असतील तेथे येणे टाळावे. रुग्‍णाने स्‍वतः नाकावर साधा रुमाल बांधावा, रुग्‍णाची सेवा शक्‍यतो कुटूंबातील एकाच व्‍यक्‍तीने करावी. घरात जर कोणी अतिजोखमीचे आजार असणारे असतील तर त्‍यांच्‍या निकट सहवासात जाऊ नये.

घरात ब्लिच द्रावण तयार करावेयाचा उपयोग, रुग्‍णाचा टेबल, खुर्ची, रुग्‍णाचा स्‍पर्श होतील असे पृष्‍ठ भाग पुरसण्‍यासाठी करावा. रुग्‍णाने वापरलेले टिश्‍यू पेपर अथवा मास्‍क इतस्‍तत टाकू नयेत. रुग्‍णाने वापरलेले रुमाल गरम पाण्‍यात भिजून नंतर स्‍वच्‍छ धुवावेत. रुग्‍णाचे अंथरुण पांघरुण टॉवेल हाताळल्‍यास हात साबण व पाण्‍याने स्‍वच्‍छ धुवावेत. रुग्‍णाने भरपूर विश्रांती घ्‍यावी आणि द्रव पदार्थ घयावेत. रुग्‍णाने धुम्रपान करु नये, डॉक्‍टरांच्‍या सल्ल्‍याने औषधे घ्‍यावीत. दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्‍यात मीठ हळद टाकून गुळण्‍या कराव्‍यात तसेच गरम पाण्‍यात नि‍लगिरी तेल / मेंथॉल टाकून त्‍याची वाफ घ्‍यावी. ताप आणि फ्ल्‍यूची इतर लक्षणे मावल्‍यानंतर किमान 24 तासापर्यत घरी रहावे. धाप लागणे, श्‍वास घेताना छातीत दुखणे, खोकल्‍यातून रक्‍त पडणे, ताप न उतरणे अशी लक्षणे आढळल्‍यास तसेच लहान मुलांमध्‍ये चिडचीडपणा वडल्‍यास, खाण्‍यास नकार , उलटया अशी लक्षणे दिसल्‍यास तात्‍काळ डॉक्‍टरांना दाखविणे आवश्‍यक आहे.

स्रोत : जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर आणि गुगल वेबसाईट

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*