नगर पुन्हा पूर्वपदावर; पोलीस उपअधीक्षकांनाच धक्काबुक्की

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी थंडावताच अहमदनगर शहरासह जिल्हाभरात विविध गुन्हेगारी घटनांनी डोके वर काढले आहे. याचा फटका दस्तुरखुद्द पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनाही बसला.

अहमदनगर शहरातील झोपडी कॅन्टीन परिसरात असणाऱ्या दीपक पेट्रोल पंपावर बुधवारी, 1 मे रोजी रात्री 11 च्या दरम्यान पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी गणेश रामदास चव्हाण यांना दुचाकीमध्ये पेट्रोल कमी टाकल्याचा जाब विचारल्यामुळे धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. चव्हाण व उपअधीक्षक मिटके हे बुधवारी रात्री खासगी कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून प्रोफेसर चौक येथे गेले होते. तेथून रात्री अकराच्या दरम्यान पोलिस मुख्यालयाकडे परत जात होते. गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी चव्हाण यांनी गाडी पेट्रोलपंपावर नेली. अगोदर त्यांनी शंभर रुपयांचे पेट्रोल भरले. पुन्हा शंभर रुपये देऊन पेट्रोल भरण्यास सांगितले. मात्र सदर कर्मचाऱ्याने पेट्रोलमीटर मध्ये कोणतीही सेटिंग न करता नोझल फक्त गाडीच्या पेट्रोल टाकीत धरले. मीटर मध्ये शून्य सेटिंग न करताच पुर्वीच्याच शंभर रुपयांचे आकडे मोजल्याचा भास करत पेट्रोल टाकल्याचे सांगितले. त्याचा जाब चव्हाण आणि मिटके यांनी विचारला असता त्यांनाच कर्मचाऱ्यांनी अरेरावी करण्यास सुरुवात केली.याबाबत चव्हाण यांनी पेट्रोलपंप मॅनेजर गोरख ठाकूर याच्याकडे तक्रार केली व ‘दुचाकीतील पेट्रोल मोजून द्या’ असे सांगितले पण मॅनेजरने यासाठी नकार दिला. त्याच दरम्यान पेट्रोलपंपावरील 10 ते 12 जनांचा जमाव जमा झाला.त्यांनी चव्हाण व मिटके यांना शिवीगाळ व धक्काबुक्की सुरू केली, त्यांची गाडीही लोटून देण्यात आली. रात्रीच्या पॅट्रोलिंग वरील पोलिस पेट्रोलपंपावर आल्यावर कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला. मात्र आकाश आल्हाट व मॅनेजर गोरख ठाकूर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून इतर कर्मचाऱ्यांची नावे समजली. या प्रकरणी आतापर्यंत 11 जणांविरुद्ध धक्काबुक्की व आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नगरकरांमधून संताप
दरम्यान या घटनेबाबत नगरकरांमधून संताप व्यक्त होत असून प्रत्येक जण ज्याचा त्याचा पेट्रोलपंपा वरील कटू अनुभव कथन करत आहेत. मात्र किरकोळ गोष्ट म्हणून सर्वसामान्य नागरिक तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. तरी प्रशासनाने स्वतः दखल घेऊन पेट्रोलपंप चालकांकडून केली जाणारी ही लूट थांबवावी अशी मागणी वाहनधारक करत आहेत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*