शिर्डी, नगरच्या निकालावर ठरणार जिल्ह्याचा हक्कदार कोण..!

अहमदनगर :

नगर जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्षाची नाही तर विखे व थोरात या दोन राजकीय गटामधील कुरघोडीचे राजकारण सुरू असते. नगर जिल्ह्याचा हक्कदार कोण, हे ठरविण्यासाठी कोणत्याही निवडणुकीत हे दोन्ही गट एकमेकांना भिडतात. त्यात विजयी होणाऱ्याची पकड जिल्हा मेनी करतो. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात लढत वेगळ्या पद्धतीने झाल्याने कोण आपला हक्क आणि पकड मजबूत करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

नगर व शिर्डी या दोन्ही जागांवर यंदा अटीतटीचीच लढाई झालेली आहे. कोण विजयी होणार हे कोणीही छातीठोकपणे सांगेना असेच चित्र आहे. यंदाची ही लढत भाजप-शिवसेना महायुती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातच झाली. मात्र, महायुतीला विखे गटाची, तर आघाडीला थोरात गटाची ताकद मिळाली. मागील पंधरा वर्षे राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात हे दोघेही काँग्रेस पक्षात आहेत. पक्षांतर्गत लढाईत अनेकदा विखे गटाने थोरात यांच्यावर मात केली आहे. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विखे महायुतीकडून तर थोरात आघाडीकडून होते. आघाडीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचीही मदत होती. त्यामुळेच यंदा जिल्ह्यातील दोन्ही जागांच्या विजयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

नगरमध्ये भाजपचे डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात थेट लढत झाली. विखे गटाने येथे भाजप व शिवसेना यांच्या मदतीने विजयाचा दावा केला आहे. तर, जगताप यांनी पवार आणि थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. शिर्डी या राखीव मतदारसंघात मात्र, विखेंचे म्हणजेच सेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे व काँग्रेसच्या थोरात गटाचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यात लढत झाली. या दोन्ही जागांवर विखे विरुद्ध थोरात व पवार अशीच लढत झाली.

दोन्ही जागांवर कोणत्या पक्षाचे उमेदवार निवडून येतात त्यावर जिल्ह्याचा कारभारी ठरणार आहे. नगर व शिर्डीच्या दोन्ही जागा मोठ्या फरकाने जिंकून संपूर्ण जिल्हा सुजयपर्वाद्वारे विखेमय करण्याची तयारी विखे यांनी केली आहे. तर, या दोन्ही जागांवर आघाडीचे उमेदवार निवडून आणून विखेंनी पावर खालसा करण्याची तयारी थोरात यांनी केलेली आहे. या दोन्ही गटापैकी कोणाची जिल्ह्यावर खऱ्या अर्थाने पकड आहे हे २३ मे रोजीच्या निकालानंतर ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*