बीडमध्ये कोणाचा लागणार ‘निकाल’..?

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती व मावळनंतर सर्वाधिक चर्चा होत असलेला मतदारसंघ म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ. येथे भाजपच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे व राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. मात्र, या दोघांपेक्षा ही लढत भाजपाच्या मंत्री पंकजाताई मुंडे व राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावंडांवर केंद्रित झाली आहे. बीडच्या निवडणुकीमध्ये कोणी विजयी ठरणार यावर मुंडे कुटुंबातील बहीण-भावांचा निकाल लागणार आहे.

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर यंदा प्रथमच कुटुंबातील राजकारण लोकसभेच्या रणांगणात पेटले आहे. बीड लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंडे कुटुंबीयांचे रणभूमी बनलेला आहे. या मतदारसंघात भाजपच्या खासदार मुंडे यांचा विजय झाल्यास राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची राजकीय ताकद आणखी वाढणार आहे. तर, मुंडे यांचा पराभव होऊन ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्यास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे आणखी प्रभावीपणे राज्याच्या राजकारणात वेगाने मुसंडी मारतील. भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे नेते लोकसभा मतदारसंघ आपल्याच ताब्यात राहणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, मतदारांच्या मनात काय आहे? बेरजेच्या राजकारणात बीड जिल्ह्यातील मतदार पंकजाताई मुंडे यांना साथ देणार की राज्यात नव्याने उभारीला आलेल्या धनंजय मुंडे यांना ताकद देणार हे दि. 23 मे रोजीचा निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*