Blog | पवार साहेबांच्या या गोष्टी चुकल्याच की..!

शरद पवार म्हणजे देशाच्या राजकारणातील पॉवरफुल व्यक्ती. ज्येष्ठ आणि आदरणीय तरीही नेहमी उलटसुलट चर्चेत असलेल्या पवार साहेबांचे राजकारण अखेरच्या टप्प्यावर आहे. अशावेळी थोडक्यात आणि मार्मिकपणे पवारांच्या राजकारणाचे काही पैलू उलगडून दाखविण्याचा प्रयत्न डॉ. भारत करडक (करडकवडी, नेवासा, अहमदनगर) यांनी केला आहे. वाचा त्यांच्याच शब्दांत जसाच्या तसा…

मा. शरद पवार साहेबांनी वयाच्या ७९ व्या वर्षी ७८ सभा घेवुन लोकसभा निवडणुक गाजवली. मतदान संपताच लगेच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले. याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे.

त्यासोबतच ५० हुन अधिक वर्षे राजकारणात राहुनही दुसरी मजबुत फळी ते का निर्माण करु शकले नाहीत यावर चिंतन व्हायला हवे. आज त्यांची दुसरी फळी केवळ सांगकामी अन जी हुजुर करणारांनी भरलेली आहे असे जाणवते.

एका जुन्या म्हणी प्रमाने, जर तुम्हाला जगण्यासाठी एका वर्षाची तजवीज करायची असेल तर धान्य पेरा, पुढील काही वर्षे जगायचे असेल तर फळझाडे लावा, अन पुढील १०० वर्षे जीवन अनुभवायचे असेल तर, माणसं पेरा!!

गेली ५० वर्षे साहेबांनी जी माणसे पेरली त्यातील बहुतेक साहेबांकडून मिळणारा फायदा बंद झाला की साहेबांना सोडुन गेली. मुळात जी जमा केली होती, ती केवळ निवडुन येण्याची क्षमता (मॅन पावर, मनी पावर) यावरच आधारलेली असल्याने परिणाम अपेक्षितच होता.

१९९३ ला (साहेबांनी) महाविद्यालयीन निवडणुका बंद करुन महाराष्ट्रातील विद्यार्थी चळवळ संपवली. त्यातुन निर्माण होणारे नेते घराणेशाहीला आव्हान देतील म्हणुन सामान्य कुटुंबातील युवकांना नेत्रुत्वाचे दालनच उघडु दिले जाणार नाही याची काळजी घेतली गेली.

खाजगी क्षेत्रात काम करताना, नविन पिढी घडवायला जी काळजी घेतली जाते, ती राज्य चालवण्याच्या राजकीय क्षेत्रात घेतली जात नाही, हे पवार साहेबांकडे पाहुन वाटते. इतरांचे सोडुन देवुत, परंतु पार्थ पवारला राजकारणात आणताना देखिल कुठलिच (आर्थिक सोडुन) तयारी केली गेली नव्हती हे प्रकर्षाने जाणवले. राज्याचे नेत्रुत्व करणाऱ्या कुटुंबाकडुन हे अपेक्षित नव्हते.

एकाच कुटुंबाकडे मालकी असलेल्या व्यवसायांमध्ये पुढील पिढीकडे व्यवसाय देण्यासाठी मुलांकडुन भरपुर तयारी करुन घेतली जाते. खाजगी उद्योजक कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तींना नेत्रुत्व देत नाहीत. आजच्या राजकीय पक्षांची अवस्था या खाजगी एकल-मालकी कुटुंबासारखीच आहे. याऊलट कार्पोरेट कंपन्यांमध्ये नवे व्यवस्थापक तयार करने वा दुसरीकडुन आयात करणे हा नियोजनाचा भाग असतो.

प्रशासकीय क्षेत्रामधे तर प्रशिक्षणावर मोठाच खर्च केला जातो. मसुरी, हैद्राबाद अन पुणे येथिल संस्था नामांकीत आहेत. अर्थात “मसुरी”ला जावुन आल्यावर प्रशासकामधील “असुरी” शक्ती का वाढत जातात हा एक संशोधनाचा विषय आहेच!

नेत्रुत्व तयार होऊ दिले नाही तर पुढील पिढीला दिशा कोण देणार, हा विचार जाणत्यांनी करायलाच हवा होता.

#राजकारणाचे_व्यवस्थापन

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*