झाशीच्या राणीचा जळगावकरांना विसर..!

जळगाव :

पारोळा किल्ला म्हणजे झाशीच्या राणीचे माहेरघर. जुलमी इंग्रजी राजवटीच्या विरोधात लढणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या याच माहेरघराला जळगावकरांच्या अनास्थेचा फटका बसला आहे. अतिक्रमण व अस्वच्छता यांच्या विळख्यात हा किल्ला सापडला आहे. या किल्ल्याला आता इको-प्रो संस्थेचे स्वयंसेवक चकाचक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या संस्थेच्या स्वयंसेवकांनी पाठविलेली प्रेसनोट पहा : ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्रभर परिक्रमा करीत असलेल्या इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि़ ७) जळगाव जिल्ह्यातील पारोळा भेट दिली. गावाच्या प्रारंभी झाशीची राणी लक्ष्मीबाई व शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. येथून जवळच विचखेडे नावाचे छोटेसे शहर आहे. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पारोळा भुईकोट बांधण्यात आला. हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात सुंदर व मोठा भुईकोट आहे. हा किल्ला १७२७ मध्ये जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. किल्ल्याभोवती चारही बाजूला खोल खंदक आणि पूर्वेकडे विस्तीर्ण तलाव बांधला आहे. पावणेतीन शतके उलटूनही या तलावाची स्थिती चांगली आहे. सपाट मैदानावर बांधलेल्या या भुईकोट किल्ल्याची लांबी ५२५ फूट; तर रुंदी ४३५ फूट आहे. वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. पारोळा शहरालाही चारही बाजूंनी तटबंदी आहे. एकूण सात दरवाजे असून, दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील मुख्य दरवाजा आहे. धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, अमळनेर दरवाजा, पीर दरवाजा अशी अन्य प्रवेशद्वारांची नावे आहेत. जवळपास तीनशे वर्षांपूर्वी किल्ल्याची उभारणी करताना पारोळा गावाची निर्मिती झाल्याची नोंद इतिहासात आहे. या परिसरात त्या काळात पेंढाºयांची जवळपास ५० घरे होती. त्यांची ओळख म्हणून आजही या गावातील एका भागाची ओळख ‘पेंढारपुरा’ म्हणून आहे. सध्या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे खंदकावरून जाणाºया मार्गावरील मुख्य दरवाजा नवीन बसविण्यात आला आहे. किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा मजबूत भाग आहे. त्याला बालेकिल्ला असे म्हणतात बालेकिल्ल्याला चार गोलाकार भव्य बुरूज आहेत. त्यांची उंची साधारणत: पंचवीस फूट असावी. इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल, या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरुजांचे आतील बाजूचे सौंदर्य नष्ट झाले आहे. किल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याला सध्या रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथे एका भुयाराचे तोंड आहे. हे भुयार येथून आठ किलोमीटर दूर असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे सांगितले जाते. हे भुयार घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे आहे. याच भुयाराचा वापर राणी लक्ष्मीबाईने पारोळ्यातून बाहेर पडण्यासाठी केला होता, असे म्हटले जाते; परंतु त्याबद्दल अधिकृत अशी माहिती मिळत नाही. राणीच्या माहेरचे वंशच म्हणजेच तांबे घराणे आजही पारोळा गावात राहतात. स्थानिकांनी केलेल्या अतिक्रमणाने त्याचे सौंदर्य धोक्यात आले आहे. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या माध्यमातून किल्ल्याची जपणूक व सौंदर्यात भर टाकण्यासाठी निधी मिळविण्यात आला आहे. त्या माध्यमातून या परिसरात जॉगिंग ट्रॅक, बगिचा आणि नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू आहे. दरम्यान विदर्भातून मराठवाडा मार्गे खान्देशात आलेल्या इको-प्रोच्या टीमने जळगाव भेटीनंतर मंगळवारी सकाळी पारोळा गावाला भेट दिली. अध्यक्ष बंडू धोतरे यांनी स्थानिक नागरिकांच्या भेटी घेऊन किल्ल्याची पाहणी केली. लोकसहभागातून अधिक चांगल्या पध्दतीने स्वच्छता कशी करता येईल, यावर मार्गदर्शन केले. चंद्रपूर येथील गोंडकालीन किल्ला सफाईच्या सलग ७०० दिवसांच्या उपक्रमाची माहिती दिली. ध्वनीचित्रफित बघून प्रेरीत झालेल्या स्थानिक नागरिकांनी या ऐतिहासिक किल्ल्याची निगा राखण्यासाठी सहभाग देण्यासाठी होकार दिला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*