लोकसभा निकाल ठरविणार नगर-सोलापूरची राजकिय दिशा

पुणे :

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील नेते खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचीच चर्चा राज्यभरात होती. हे दोन्ही दिग्गज नेते भाजपवासी होणार असल्याच्या बातम्यांनीच पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या दोन्ही राजकीय दिग्गज कुटुंबीयांची पुढील वाटचाल स्पष्ट होणार आहे. त्यानुसारच अहमदनगर व सोलापुर या दोन्ही जिल्ह्यांची राजकीय दिशा स्पष्ट होईल.

नगर जिल्ह्यावर विखे कुटुंबीयांचे एक हाती राजकीय वर्चस्व आहे. विविध निवडणुकांमध्ये विखे फॅक्टर नेहमीच चर्चेत असतो. हाच फॅक्टर नगर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणातील विजय आणि पराभव निश्चित करतो. सध्या संपूर्ण विखे कुटुंबीय भाजपच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांना नगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. सुजय विखे जर या जागेवर निवडून आले तर पुन्हा एकदा नगर जिल्ह्यावर विखे कुटुंबीयांचे वर्चस्व असल्याचे सिद्ध होणार आहे. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नगरच्या जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा विजय झाल्यास विखे कुटुंबियांच्या पुढील राजकीय दिशा काय असतील याचीच उत्सुकता नगर जिल्ह्याला व राज्याला लागली आहे.

नगरमध्ये असे चित्र असतानाच माढा (जि. सोलापूर) लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे संजय शिंदे विजय होणार की खासदार विजयसिंह मोहिते यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. येथे भाजपचे उमेदवार विजय झाल्यास विजयसिंह व त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते यांचे राजकीय स्थान आणखी बळकट होणार आहे. मात्र, संजय शिंदे यांचा विजय झाल्यास मोहिते कुटुंबाला याचा मोठा फटका बसेल. अशावेळी विधानसभा निवडणुकीसाठी ते कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष असेल.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*