पवार आजोबांचा हात रोहितच्या पाठीवर..!

अहमदनगर :

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीतून वेगळा संदेश कार्यकर्ते व राजकीय अभ्यासक घेत आहेत. अशावेळी दुष्काळी दौऱ्यात पवार आजोबांनी युवा नेते व नातू रोहित दादा पवार यांनाही नेले आहे. पवारांच्या तिसऱ्या पिढीचे शिलेदार कोण, असे प्रश्न पडलेल्या सगळ्यांनी त्याचा सोयीस्कर अर्थ काढला आहे.

लोकसभा निवडणुकीत नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे पुत्र पार्थ यांनी मावळ (जि. पुणे) मतदारसंघातुन उमेदवारी केली आहे. त्यांच्या प्रचारातही पवार आजोबांनी मोजक्याच सभा घेतल्या आहेत. तसेच ‘पार्थ ठेच लागली की आपोआपच शिकेल’ असेही वक्तव्य केले आहे. त्याचा नेमका अर्थ काय याचे अनेकांना कोडे पडले आहे. अशावेळी दुष्काळी दौऱ्यात दुसरे नातू रोहित यांना बरोबर नेऊन पवार आजोबांना नेमके काय म्हणायचे आहे, याचीच उत्सुकता राष्ट्रवादी वर्तुळात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी कोकण दौऱ्यावर गेल्यावर पवार आजोबांनी रोहित व पार्थ या दोघांनाही बरोबर घेऊन हेच तिसऱ्या पिढीतील शिलेदार असल्याचा संदेश दिला होता. मात्र, आताच्या दुष्काळी दौऱ्यात फक्त रोहित हेच त्यांच्या बरोबर आहेत. त्यानिमित्ताने पवार आजोबांचा हात रोहित यांच्या पाठीवर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, पवार कुटुंबातील या दोन्ही पाती (रोहित व पार्थ) एकत्रितपणे पुढे जाणार आणि त्यांना पवार साहेब नक्कीच आशीर्वाद देतील असा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना विश्वास वाटत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*