Blog | शिल्पकलेचा सांस्कृतिक दूत पद्मविभूषण सुतार

सौजन्य : महान्युज, महाराष्ट्र शासन

महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ शिल्पकार पद्मविभूषण राम सुतार यांना नुकताच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचा ‘टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार-२०१६’ जाहीर झाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. १ कोटी रूपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कलेची साधना, जतन व तिचा प्रचार-प्रसार या माध्यमातून सांस्कृतिक सौहार्द साधण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थेस भारत सरकारच्यावतीने देण्यात येणारा सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.

टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कारासाठी निवड झालेले पद्मविभूषण राम सुतार हे पहिले मराठी कलाकार ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर महान्यूजसाठी राम सुतार यांच्याशी मारलेल्या गप्पांतून उलगडलेला त्यांचा कला क्षेत्रातील प्रवास.

धुळे जिल्ह्यातील जन्म ; कलेतील प्रवासाची सुरुवात
धुळे शहरापासून २ ते ३ मैलावर असणाऱ्या गोंदूर या गावचा माझा जन्म. वडील वंजीहंसराज सुतार हे व्यवसायाने सुतार असल्याने कलेचा संस्कार घरातूनच आला. शेतीसाठी लागणारे अवजारे, बैलगाडी आदी वस्तू माझे वडील खूपच आखिव रेखीव पद्धतीने तयार करीत असत. त्यातूनच मला चित्र रेखाटण्याची व शिल्प तयार करण्याची आवड निर्माण झाली हे सांगतानाच श्री.सुतार आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये रमल्याचा भास होत होता. शालेय जीवनात शिक्षकांनी माझ्यातील कलाकार ओळखून दिलेल्या प्रोत्साहनामुळे ते सांगतात, माझ्यातील कलाकाराची पाया भरणी झाली. गावात चौथीपर्यंत शाळा. पुढे पाचवी शिकायला म्हणून निमजाळे या गावातील शाळेत प्रवेश घेतला. सहा फुट उंचीच्या पहिलवानाचा सिमेंटचा पुतळा साकारून १९४७ मध्ये सुतार यांनी आयुष्यातं पहिलं शिल्प तयार केलं. १९२५ मधे जन्मलेल्या राम सुतार यांनी आजतागायत शेकडो शिल्प तयार केले असून जगातील जवळपास ८० देशात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी यांच्या शिल्पासह २५० शिल्पांचा यात समावेश आहे.

शिल्पातून मिळालेली पहिली कमाई
पुढे धुळ्यातील शिक्षक प्रशिक्षण संस्थेत सुतार जाऊ लागले. येथेच त्यांनी चित्रकलेच्या प्राथमिक परिक्षाही उत्तीर्ण केल्या. त्यांच्या उत्तम कामामुळे येथेच त्यांना चित्रकलेतून पैसेही मिळू लागले. शिक्षक प्रशिक्षण केंद्रात शिक्षकांना मॉडेल व चित्र तयार करून देण्याच्या मोबदल्यात त्यांना प्रती वस्तू पाच रूपये मिळकत मिळू लागली. आता सुतार यांना कामातही आनंद वाटू लागला. १९४८ साली शिक्षक प्रशिक्षण केंद्रातील शिक्षक श्रीरामकृष्ण जोशी यांच्याकडून महात्मा गांधी यांचे सिमेंटचे शिल्प तयार करण्याची ऑर्डर मिळाली. त्यांनी महात्मा गांधींचे चार फुटांचे सिमेंटचे शिल्प तयार केले. मोबदल्यात त्यांना १०० रूपये मिळाले. ही शिल्पातून मिळालेली त्यांची पहिली कमाई. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या व्यक्तीमत्वाचा खूप प्रभाव आहे. सुतार जेमतेम दुसरीत असतानाच गांधीजींनी त्यांच्या गावाला भेट दिल्याची घटना आजही त्यांना स्मरते. परदेशी कापडांच्या होळीत सक्रिय सहभाग घेत सुतार यांनी त्यावेळी आपल्या डोक्यातील गोल मखमलीची टोपी या होळीत टाकल्याचे ते सांगतात. पुढे महात्मा गांधींचे शिल्प उभारण्याची संधीच त्यांना मोठ्या प्रमाणात मिळत गेली. सुतार यांच्या कलात्मक हातातून गुजारतमधील गांधीनगर येथे सचिवालयात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधीजींच्या अलौकीक शिल्पासाठीच त्यांना पद्मश्री या मानाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये शिक्षण
रामकृष्ण जोशी यांच्या मदतीने राम सुतार मुंबईला गेले व माटुंग्यात राहू लागले. १९४९ मध्ये त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जे.जे.स्कुल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. शैक्षणिक योग्यतेमुळे त्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळाला व त्यांनी चार वर्षातच शिक्षण पूर्ण केले. येथेही त्यांनी चारही वर्ष प्रथम येण्याचा मान मिळवत ‘मेयो पदक’ पटकावले.

यानंतर त्यांनी जे.जे. म्हात्रे आणि करमरकर या तत्कालीन प्रसिद्ध शिल्पकारांसोबत काम केले. याच काळात केंद्रीय लोकसेवा आयोगाने वेरूळ व अंजिठा या जगप्रसिद्ध लेण्यांच्या देखभालीसाठी आर्टीस्टची परीक्षा घेतली. ही परीक्षा उत्तीर्ण करून श्री.सुतार यांनी १९५४ ते १९५८ या कालावधीत या लेण्यांतील मुर्त्यांच्या डागडूजीचे काम यशस्वीपणे पूर्ण केले. १९५९ मध्ये त्यांनी दिल्लीस्थित केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कार्यरत जाहिरात व दृष्य प्रचार संचालनालयाची (डीएव्हीपी) नोकरी स्वीकारली आणि तेव्हापासूनच ते दिल्लीत स्थायिक झाले.

दिल्लीतील प्रगती मैदानवरील कृषी प्रदर्शनात श्री.सुतार यांनी उभारलेला शेतकऱ्याचा पुतळा अधिकाऱ्यांना फारच आवडला व त्यांनी लगेच श्री.सुतारांची भेट घेऊन त्यांना दोन शेतकरी जोडप्याचे दोन पुतळे बनविण्याची ऑर्डर दिली. त्यांनी शेतकरी महिला व पुरूष असे प्रत्येकी १३ फुटांचे दोन पुतळे तयार केले त्याचा मोबदला म्हणून श्री.सुतार यांना १५ हजार रुपये मिळाले. हा क्षणच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. सरकारी नोकरीत राहून तुम्ही हे काम करू शकत नाही असा त्यांच्या डीएव्हीपीतील एल.आर.नायर या अधिकाऱ्याने सांगितले. श्री.सुतार यांनाही आता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कला दाखविण्यासाठी स्वतंत्र काम करण्याची निकड भासू लागल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

चंबळदेवीचे स्मारक
याच काळात तत्कालीन केंद्रीय लोकनिर्माण विभागाचे मुख्य वास्तुविशारद श्री.जोगडेकर यांना श्री.सुतार यांच्या कामाविषयी कळताच त्यांनी श्री.सुतार यांना बोलावून घेतले. केंद्र सरकातर्फे पाच फुटांचे अशोक स्तंभ उभारण्याचे काम त्यांनी श्री.सुतार यांना सोपवले. खूप अशोक स्तंभ उभारायचे होते. पण हा प्रकल्प लवकरच बंद झाला. त्यातच त्यांना भोपाळला बोलावणे आले. मध्यप्रदेश सरकारने मध्यप्रदेश व राजस्थानमधून वाहणाऱ्या चंबळ नदीवर गांधीसागर धरण बांधायला सुरुवात केली होती. या धरणासाठी दहा हजार रूपयांमध्ये चंबळदेवीचे ४५ फूट उंचीचे शिल्प काँक्रीटमध्ये कोरण्याचे काम त्यांनी स्वीकारले. चंबळदेवी आणि तिला कवटाळणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन मुलांच्या बंधुत्वभाव व्यक्त करणारे अप्रतीम शिल्प १८ महिन्यात तयार झाले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा बघून प्रभावीत झालेल्या पं. नेहरूंनी श्री.सुतारांना पंजाबमधील भाक्रा धरणावर श्रमिकांची शिल्पकृती उभारण्याचामनोदय बोलून दाखवला पण दुर्देवाने ही शिल्पकृती होऊ शकली नाही आणि त्याच ठिकाणी श्री.सुतारांनी पं. नेहरूंचा १८ फुट उंचीचा पुतळा उभारला.

संसदेच्या आवारातील १६ पुतळ्यांचे महत्त्वपूर्ण निर्माण
देश-विदेशातून भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला अर्थात संसदेला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकास राम सुतार यांच्या कामाचं सर्वांग सुंदर व सर्वोत्तम स्वरूप पहायला मिळतं ते सुतार यांच्या कलाकृतीमधून. संसदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देशाला मार्गदर्शक ठरणाऱ्या महान व्यक्तीमत्वांचे १६ पुतळे राम सुतार या मराठी शिल्पकाराने साकारले आहेत. सरासरी १६ ते १८ फुटांच्या धातू निर्मित या पुतळ्यांनी लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला वेगळी उंची प्रदान केली आहे.

८० देशांमध्ये २५० पुतळ्यांचे निर्माण
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विदेशात म.गांधीचे पुतळे उभारण्याचे काम करीत जवळपास ८० देशांमध्ये गांधींसह इतर २५० पुतळे उभारण्याची किमया या मराठी अवलिया शिल्पकाराने केली आहे.

मुलगा अनिल ही चालवत आहे वारसा
श्री.सुतार यांच्या कलेचा वारसा त्यांचे एकुलते एक चिरंजीव अनिल सुतार सांभाळत आहेत. अनिल यांना लहानपणापासूनच वडीलांच्या शिल्पकलेने प्रचंड वेड लावले. मुलाची शिल्पकलेतील गती पाहता श्री.सुतार यांनी अनिल यांना शिल्पकलेच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. दिल्लीतच पदवी शिक्षण पूर्ण करून अनिल यांनी अमेरिकेतून शिल्पकलेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पाटण्यात म.गांधींचा पुर्णाकृती पुतळा आणि कोलकात्यात सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्यात अनिल यांनी वडिलांना सहायक शिल्पकाराची भूमिका बजावली आहे. अनिल यांनी आपल्या वडिलांना गुरूदक्षिणेच्या स्वरूपात त्यांच्या शिल्पकेलेतील प्रवासावर आधारित दोन पुस्तक प्रकाशित केली. मुलाच्या शिल्पकलेतील गतीबाबत श्री.सुतार संतुष्ट आहेत.

बाप लेकांनी उभारली जगातील सर्वात उंच तलवार
काही वर्षापूर्वी पंजाबमधील अमृतसर येथील वार मेमोरियलमध्ये राम सुतार आणि अनिल सुतार यांनी जगातील सर्वात लांब १५० फुट उंचीची तलवार उभारली. कांस्य आणि स्टेनलेस स्टील धातूपासून तयार करण्यात आलेल्या या तलवारीचे वजन ६० टन आहे यावरूनच तिची भव्यता लक्षात येईल.

भारत देशाचा कला व सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्राचं नाव विविध क्षेत्रात मोठ करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत मुळचे धुळ्याचे व सध्या दिल्लीलगत नोएडा शहरात वास्तव्यास असणारे जागतिक किर्तीचे शिल्पकार पद्मविभूषण राम सुतार हे नाव अढळ ताऱ्याप्रमाणे आहे. वयाच्या ९४ व्या वर्षीही शिल्पकलेच्या माध्यमातून मातीशी संवादसाधण्याची श्री.सुतार यांची साधना अखंडपणे सुरु आहे. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीला भोवऱ्याची उपमा देताना श्री. सुतार म्हणतात, ‘भोवऱ्याला जसजशी उतरण मिळेल तसतसा तो फिरत जातो आणि शेवटी एका टप्प्यावर झिंग घेतो, तसे माझ्या बाबतीत घडले आहे’. त्यांच्या मनात महाराष्ट्राविषयी नितांत प्रेम आहे. मनात खोलवर बिंबलेले गावच्या मातीतले संस्कार घेऊनच शिल्पकलेतीलहा सर्वप्रवास असल्याचे मार्मिक भाष्य करणाऱ्या आभाळभर किर्तीच्या पद्मविभूषण राम सुतार यांच्या कार्याला मानाचा मुजरा.

लेखक : रितेश मोतीरामजी भुयार

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*