लोकसभा निकाल ठरविणार श्रीगोंद्याचे ‘गाणित’..!

अहमदनगर :

नगर जिल्हा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाचे केंद्रबिंदू. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विखे यांच्या बंडाळीमुळे हे केंद्र शाबित राहिले. त्यामुळेच भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील विरुध्द राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली. मात्र, त्यातही सर्वाधिक चर्चा झाली ती श्रीगोंद्याचीच. कारण येथून कोणाला लीड मिळणार यावरच लोकसभेचा निकाल ठरण्याची परंपरा आहे.

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांना वेळोवेळी श्रीगोंदा तालुका व विधानसभा मतदारसंघाने मदत केली. त्यांची खासदारकी शाबित ठेवायला श्रीगोंदेकर मतदारांनी भाजपला साथ दिली. येथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतृत्वही गांधींचा मतदार तोडू शकले नाहीत. माजी आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव नागवडे, बाळासाहेब नाहाटा, कुंडलिकराव जगताप अशी मोठी फळी असूनही येथून भाजपला लोकसभेत मोठी आघाडी मिळत राहिली. आता मात्र, कालानुरूप नेत्यांचे पक्ष आणि कार्यकर्त्यांचे नेते बदलले आहेत. अशावेळी यंदा हा मतदारसंघ कोणाला आघाडी देणार यावर लोकसभेच्या विजयाचे गणित व आमदारकीच्या बेरजेचे राजकारण ठरणार आहे.

आमदार अरुण काका जगताप व पुत्र आमदार संग्राम जगताप यांचे मुळगाव बनपिंप्री हे श्रीगोंदा तालुक्यात आहे. त्यामुळेच श्रीगोंदा यंदा परंपरा तोडून राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांना मोठी आघाडी देणार असल्याचा दावा आघाडीकडून केला जात आहे. जगताप यांना राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, राजेंद्र व अनुराधा नागवडे, घनश्याम शेलार यांनी मदत केली आहे. तर, भाजपचे उमेदवार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांना माजी आमदार बबनराव पाचपुते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी मदत केली आहे. त्यामुळेच येथून मिळणारी आघाडी ही नागवडे-जगताप यांना असणार की पाचपुते-शेलार यांना यावर विधानसभेचे गणित ठरणार आहे.

गणितात पक्का असलेला नेता म्हणून पाचपुते यांची ओळख आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत सहमतीचे उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी युवा नेते राहुल जगताप यांना संधी दिली. त्याला नागवडे गटाने मनापासून साथ दिली. परिणामी पाचपुते यांचे गणित फिसकटले. मात्र, यंदा आता या मतदारसंघात उमेदवारी करण्यासाठी अनुराधा नागवडे सज्ज आहेत. त्यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र, ऐनवेळी आमदार संग्राम जगताप यांना बारामतीकरांनी कौल दिला. त्यामुळेच नागवडे आता विधानसभेसाठी तयारी करीत आहेत. पवार साहेबांनी बोलाविले की काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत जाण्याचे सुतोवाच नागवडे यांनी केले आहेत. ही आमदार राहुल जगताप यांच्यासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.

लोकसभा निकाल लागला की येथून विधानसभा निवडणुकीचे गणित पक्के केले जाणार आहे. अशावेळी भाजपकडून बबनराव पाचपुते यांची उमेदवारी पक्की आहे. मात्र, नागवडे यांच्या भूमिकेमुळे येथून राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार, याचीच उत्सुकता ताणली आहे. राजकारणात अंतिम क्षणी काहीही घडू शकते. याची प्रचीती श्रीगोंदेकरांनी अनेकदा घेतली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे गणित त्यामुळेच काय असणार, जगताप-नागवडे एकत्र असणार की उमेदवारी बदलणार किंवा एखादा अपक्ष रिंगणात येऊन विजयाचा दावा करणार, याचीच चर्चा या भागात सुरू आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*