जयदत्त क्षीरसागर यांचा पवार साहेबांना ‘जय महाराष्ट्र’..!

बीड :

राष्ट्रवादीच्या दिग्गज नेतृत्वापैकी एक असलेल्या आमदार जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसैनिक होण्याचे ठरविले आहे. त्यानुसार क्षीरसागर गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये राजकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजा मुंडे यांना बोलावून जयदत्त अण्णांनी वेगळी वाट धरण्याचा संदेश दिला होता. त्यानुसार त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मोठी ताकद दिली. त्यांच्यामुळेच येथील भाजपचा विजय सुकर होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, तरीही क्षीरसागर यांनी भाजपमध्ये न जाता वेगळी वाट धरून युतीचे गणित लक्षात घेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादीमधील वाढती ताकद बीडमध्ये पक्षाला मोठे खिंडार पाडण्यासाठी जबाबदार ठरल्याची चर्चा बीडमध्ये आहे. त्याला आता धनंजय मुंडे कसे सामोरे जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*