‘मन की बात’चा फैसला ‘जनता की अदालत’ में..!

सत्तर वर्षांत जे झालेले नाही, अशी कामे करण्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपचा फैसला गुरुवारी (दि. २३ मे) होत आहे. मागील पाच वर्षे भारतीय जनतेला ‘मन की बात’ कितपत पचनी पडली याचाच निकाल लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ‘जनता की अदालत’ मध्ये होणार आहे.

२०१४ मध्ये गुजरातमधून दिल्लीत आलेल्या मोदींनी आपले मित्र आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या मदतीने पक्षाचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढविला. इतर सर्व मित्रपक्ष असोत की विरोधक असोत, सर्वांना चीतपट करून दिल्ली ते गल्लीची सत्ता हस्तगत करण्याचा बऱ्यापैकी यशस्वी प्रयत्न मोदी-शाह यांच्या भाजपने केला. अखेरीस मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग यांना भगव्या हिंदू दहशतवाद शब्दाच्या विरोधातील आंदोलन म्हणून उमेदवारीही दिली. अंतराळातील संशोधन असो की गुप्तपणे केली जाणारी लष्करी कारवाई (सर्जिकल स्ट्राईक) सर्व मुद्यांचे श्रेय घेण्यात मोदी आघाडीवर राहिले. त्याच मुद्यांवर त्यांनी यंदाची निवडणूक लढविली.

शेतकरी समस्या, ग्रामीण भागाची पीछेहाट, कष्टकरी व मध्यमवर्गाची नाराजी हे सगळे मुद्दे बाजूला सारून धार्मिक राष्ट्रवाद व सुरक्षित देश या मुद्यांवर त्यांनी मन की बात करीत निवडणुकीच्या प्रचारात बाजी मारली. कॉंग्रेस असो की इतर विरोधी पक्ष व मित्रपक्ष, या सर्वांना आपल्याभोवती पिंगा घालायला मोदी-शाह यांनी भाग पडले. एकही पत्रकार परिषद न घेता मन की बात याद्वारे आपली भूमिका मोदी मांडीत राहिले. त्याचाच फैसला लोकसभेच्या निवडणुकीत होणार आहे. त्याच्या निकालाकडे त्यामुळेच देशाचे लक्ष लागले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*