निकाल लोकसभेचा; गणिती जुळवाजुळव विधानसभेची..!

पुणे :

देशातील उत्तरप्रदेश या मोठ्या राज्यानंतर ४८ लोकसभेच्या जागा असलेल्या महाराष्ट्राला संसदेत महत्वाचे स्थान आहे. येथील ४८ पैकी किती जागांवर भाजप-शिवसेना यांच्या महायुतीचा विजय होणार, आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला कितपत यश मिळणार हे गुरुवारी (दि. २३ मे २०१९) निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र, येथील विजयाच्या गणितावर विधानसभेची खऱ्या अर्थाने जुळवाजुळव होणार आहे.

२०१४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या विरोधात लाट असल्याचा फायदा घेत भाजपने राज्यात जोरदार मुसंडी मारली. राज्यातील ४२ जागांच्या जीवावर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजप-सेनेला मराठी मतदारांनी कौल दिला. मात्र, पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी युतीच्या विरोधात मोठी नाराजी आहे. त्याच जोरावर राज्यात पुन्हा पुनारागमन करण्याची तयारी आघाडीने केली आहे. त्याच्या प्रयत्नाला कितपत यश येणार हे लोकसभेच्या निवडणूक निकालातून दिसणार आहे.

निकाल लागला की विधानसभा निवडणुकीचे गणित मांडले जाणार आहे. राज्यात किमान २० जागांसह आघाडीने पुनरागमन केल्यास भाजपचे धाबे दणाणणार आहे. मात्र, त्यापेक्षा कमी जागा आघाडीच्या पदरात पडल्यास भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. तसेच सेनेला किती जागा मिळतात, त्यावरही विधानसभेच्या मित्रत्वाचे गणित मांडले जाणार आहे. त्यामुळेच या निकालाला विशेष महत्व आलेले आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*