Blog | निकाल लागला पण कोणाचा..!

लोकसभा निवडणुकीच्या निकालात कोण जिंकाल, कोण हरला, कोणी कोणाला पाडले, कोण कोणामुळे पडले आणि त्याचे आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार असल्या मुद्यांची चर्चा जोरात आहे. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्रातील काही निकालांमुळे मिळालेला सकारात्मक किंवा नकारात्मक संदेश काय, त्याचे काय परिणाम होणार याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही की काय असेच चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुयोग्य नियोजनाची झलक लोकसभा निकालाच्या आकाद्यांतून स्पष्ट झाली आहे. सध्या माध्यमे नेहमीप्रमाणे ‘गाऊ त्यांना आरती’ करीत आहेत. भाजप निवडून आला म्हणून ही प्रमुख माध्यमे चेकाळलीत अआसेच काही नाही, इतर काहीही निकाल लागला असता तरी भुक्कड टीआरपीपुढे त्यांना सामाजिक, आर्थिक, राजकीय व वैचारिक मुद्दे आठवलेच नसते. आपल्याकडे लोकशाही आहे आणि त्यातला स्वयंघोषित का होईना पण माध्यमे चौथा खांब आहेत. याचेही भान माध्यमांनी सोडले आहे. त्यातलाच प्रकार निकाल लागून २४ तास उलटले तरीही वृत्त वाहिन्यांवर दिसतोय.

पंतप्रधान मोदी व त्यांच्या टीमने नियोजनबद्ध प्रचार करून ही निवडणूक सहजपणे खिशात घातली. तो त्यांचा लोकशाहीदत्त अधिकार आहेच की. पण माध्यमांतून सुरू असलेला नौटंकीबाज खेळ नेमका कधी थांबणार, असा प्रश्न पुन्हा एकदा यानिमित्ताने पडतोच की. भाजपा व लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्रित प्रचार करून २०१४ पेक्षाही भरीव यश मिळवले. हे निवडणुकीच्या राजकारणात नक्कीच कौतुकास्पद आहे. तर, काँग्रेस पक्ष आणि इतर स्वयंघोषित पुरोगामी-प्रतिगामी विरोधकांमधील बेकी नक्कीच टीकेची हक्कदार आहे. मात्र, निवडणूक आणि सरकार याच्याही पलीकडे भारत हा सुमारे १२५ कोटी जनतेचाही देश आहेच की. त्यांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी आवाज बनण्याची तयारी टीआरपीबाज भुक्कड माध्यमांना कधी समजणार आहे?

निवडणुकीचे आकडे सोशल मिडीयावर वेगाने फिरत आहेत. अगदी कोणत्या गावात कोणत्या उमेदवाराला किती मतदान पडले, याचेही आकडे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेत. फेसबुक व व्हाट्सअॅप विद्यापीठातही फिरत आहेत. तरीही देशातील शेतकरी आणि सर्वसामान्य यांच्या बातम्यांचा दुष्काळ काही मिटलेला नाही. निवडणूक म्हणजे राजकीय बातम्यांचा ओला दुष्काळ असतो. हे एकवेळ मान्यही करू. पण पेट्रोल-डीझेल यांचे भाव वाढत आहेत, वाढणार आहेत. मुंबई व सुरतेत आगीच्या घटना घडत आहेत. बेरोजगारी काही हटलेली नाही आणि हटण्याची काहीही चिन्हे नाहीत. काँग्रेस आली की हे प्रश्न एकाच फटक्यात निकाली निघाले नसते. तसेच भाजपही याला जादूच्या कांडीने नाही सोडवू शकत. त्यासाठी सामान्य जनता आणि माध्यमांनी जबाबदारीने देशापुढील समस्या सातत्याने मांडाव्या लागतात.

मात्र, याचे भान सुटून बेभान झालेल्या माध्यमांनी मोदिस्तान नावाच्या नवीन संकल्पेचा चित्कार केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षा माध्यमांना जास्त आनंद झाल्याचे चित्र आहे. अशावेळी पुन्हा एकदा काही महाभागांनी ज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांना टार्गेट करून फुत्कार टाकण्यासही सुरुवात केली आहे. तर, काही नवे-जुने खासदार विखारी शब्दफेक करायला लागले आहेत. अशावेळी माध्यमांनी देशात समतोल आणि शांततापूर्ण सौहार्दाचे वातावरण कायम ठेवण्याची जबाबदारी उचलायला पाहिजे. महाराष्ट्रासह देशभरात दुष्काळ जोरावर आहे. तर, माध्यमांनी निकाल लागूनही शेतकरी आत्महत्या व शेतीचे प्रश्न यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ असल्याचे दाखवून दिलेले नाही.

अशावेळी लिहायला कितीही मुद्दे आहेत. पंतप्रधान मोदी व त्यांची टीम देशापुढील हे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम आहे. भारतीयांनी त्यांना ही जबाबदारी दिली आहे. मात्र, अशावेळी सरकार व सरकारी यंत्रणेला त्यांच्या कर्तव्याचे भान देण्याची जबाबदारी जनता व माध्यमांवर आहे. मात्र, आपली माध्यमे झोपा काढीत आहेत आणि आपण जनता म्हणून बेजबाबदार किती दिवस राहणार आहोत..!

लेखक : सचिन मोहन चोभे, संपादक, कृषीरंग (मो. ९४२२२१५६५८)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*