ईव्हीएम मुद्यावर राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत वाद; पक्षामध्येच संशयास्पद वातावरण..!

मुंबई :

लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये देशातील ३७४ मतदारसंघामध्ये झालेले मतदान व मोजलेल्या मतदानाचे आकडे जुळलेले नाहीत. काही ठिकाणी दोन्हीमधील फरक लाख मतापेक्षा जास्त आहे. त्यामुळेच सध्या देशात ईव्हीएम या मुद्यावर संशयाचे वातावरण आहे. मात्र, याच संशयास्पद मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीमधील हे संशयास्पद वातावरण नेमकी काय हवा दर्शविते याचेच कोडे सामन्यांसह राजकीय धुरिणांना पडले आहे.

विसाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुन्हा एकदा पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पराभवाची जबाबदारी ईव्हीएमवर टाकून जमणार नसल्याचे म्हटले आहे. महिनाभरापूर्वी निकाल हाती येण्याच्याही अगोदर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ईव्हीएम मुद्यावर संशय व्यक्त करून निकालाबद्दल काळजी व्यक्त केली होती. त्यावेळीही अजित दादा यांनी ईव्हीएमच्या बाजूने कौल दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादीसह देशभरातील प्रमुख राजकीय पक्ष आणि शरद पवार यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांनी ईव्हीएम मुद्याबद्दल गंभीर आक्षेप नोंदविले आहेत. एकूण झालेले मतदान व मोजलेल्या मतदानातील घोळ हाच जनतेसाठी संशय निर्माण करणारा आहे. त्यावर अजूनही निवडणूक आयोगाने ठोस भूमिका मांडलेली नाही. फ़क़्त मशीन निर्दोष असल्याचे सांगून आकडेवारीच्या घोळावर बोलणे प्रशासनाने टाळले आहे.

तोच धागा पकडून शरद पवार यांच्यासह अनेकांनी ईव्हीएमवर निवडणुका नको असल्याची मागणी केलेली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या मशिनचे सदोष आकडे संशयास्पद असल्याचे पुन्हा एकदा म्हटले. तर, अजित दादा यांनी मात्र विजयावर ईव्हीएमबद्दल आपण काही बोलत नाहीत. मग पराभवानंतर त्यावर बोलून जबाबदारी झटकणे शक्य नसल्याचा विचार मांडला. एकूणच राष्ट्रवादीमध्ये ईव्हीएमच्या मुद्यावर आता अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. काका व पुतण्या यांची एकाच मुद्यावर परस्परविरोधी भावना म्हणजे काहीतरी वेगळा राजकीय संकेत तर नाही ना, अशीही शंका त्यामुळे येण्यास सुरुवात झाली आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*