निळवंडेच्या निमित्ताने विखे-पिचड एकी..!

अहमदनगर :

प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन निळवंडे धरण प्रकल्प आराखड्यानुसार बनविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर जिल्ह्यातील शिष्टमंडळास दिले आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यातील वाढलेला एकोपा जिल्ह्यामध्ये विशेष चर्चेत आहे. तर, विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये आणखी कुरघोडीचे डाव रंगण्याची शक्यता नागरिक व्यक्त करीत आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपने देशात एकहाती विजय मिळविला आहे. त्यामुळे इतर पक्षातील अनेकजण भाजपमय होण्यासाठी इच्छुक आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यानंतर आता त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये डेरेदाखल होत आहेत. दि. १४ जूनच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे मंत्रिपद पक्के असल्याचे दिसते. अशावेळी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यासह त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड हेसुद्धा लवकरच भाजपवासी होण्याची चर्चा असतानाच निळवंडे धरण मुद्यावर मुंबईत झालेली बैठक विशेष संकेत देणारी आहे. त्यानुसार राष्ट्रवादीला पिचड यांच्या निमित्ताने आणखी एखादा झटका बसण्याची शक्यता अकोले तालुक्यासह नगर उत्तरेत चर्चेला आहे.

खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे-पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, वैभव पिचड, माजी मंत्री मधुकर पिचड, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह झालेल्या या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचे अजूनही कोणी म्हटलेले नाही. मात्र, तरीही सध्याची राजकीय हवा लक्षात घेता या बैठकीला वेगळे परिमाण प्राप्त झाले आहेत हे निश्चित. विखे-पिचड यांच्या एकीमुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*