नगर जिल्ह्याचे पालक’मंत्री’ कोण..?

अहमदनगर :

सत्तेत असोत की विरोधात, नगर जिल्ह्यामध्ये मागील चार दशकांमध्ये विखे कुटुंबियांचा सर्वाधिक दबदबा आहे. आता तर, मंत्रिपद, जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि खासदार अशी तीन महत्वाची पद या कुटुंबीयांकडे असल्याने जिल्ह्यावर विखे गटाचे एकहाती वर्चस्व सिद्ध झाले आहे. मात्र, त्यामुळेच आता जिल्ह्याचे खरे पालक’मंत्री’ कोण असाच प्रश्न भाजपसह सर्वच पक्षांच्या गोटात निर्माण झाला आहे.

काँग्रेसतर्फे राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी काम करतानाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्हा परिषद असोत की इतर सरकारी यंत्रणा, सर्वांवर विखे गटाची भक्कम पकड होती. भाजपच्या मंत्री व आमदारांपेक्षा त्यांच्याच शब्दाला अधिक वजन होते. विरोधात असलेले हेच विखे आता सत्तेत सहभागी होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय बनले आहेत. त्यामुळे त्यांच्या शब्दाचा मान आणखीनच वाढला आहे. त्यामुळेच पालकमंत्री राम शिंदे यांच्या गोटात आता सुप्त खळबळ आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे असतील, असा दावा आताच या गटातील कार्यकर्ते करीत आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदी शालिनीताई विखे सध्या आहेत. नव्या निवडीत त्यांना नाही पण, विखे गटातीलच कोणालाही या पदावर काम करण्याची संधी मिळू शकते. तसेच खासदार डॉ. सुजय विखे यांनी गावोगावी संघटन आणखी मजबूत करण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री यापुढे कोणीही असोत, पुढचे पूर्ण दशक जिल्ह्याचे खरे राजकीय पालक विखे कुटुंबीय असतील, असेच चित्र आहे. नागरिकांमध्ये याचीच चर्चा आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*