Blog | मग युती होईलच की..!

राज्यातील सर्वात महत्त्वाचा विषय कोणता यावर एक्झिट पोल घेतल्यास सर्वाधिक जास्त टक्केवारीचे उत्तर असेल महायुती तुटणार की अभंग राहणार..! होय, दुष्काळ असोत की अर्धपोटी व अर्धनागडेपणा, महाराष्ट्रासह भारतीय जनतेतील सगळ्यांना मुख्य विषय राजकारण हाच वाटतो. लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठ्या जोशात सत्ता राखल्याने देशासह राज्यातील विधानसभा निवडणुकीत काय होणार, याबाबत सगळेच अंदाज व्यक्त करीत आहेत. त्यातील एक प्रमुख अंदाज म्हणजे भाजप व शिवसेना यांची युती तुटणार नाही..!

एकदा सगळे मुद्दे निकाली काढून भावनिक राजकारण सुरू झाले की, देशासह राज्यही संकटमुक्त होत असते. सध्या देशातील स्थिती या टप्प्यावर आहे. दुष्काळ, बेरोजगारी, गुन्हेगारी व सर्वसामान्य लाचारी याचा विसर पडून जनता पाकिस्तान नावाच्या देशावर डोळा ठेऊन बसली आहे. त्यातूनच प्रमुख विषय मागे पडून धार्मिक राजकीय विचार फोफावत आहेत.

अशावेळी भाजप सध्या राज्यात एकहाती सत्ता मिळवू शकत असल्याचे चित्र आहे. मात्र, त्यातील प्रमुख अडसर आहे महायुती..! त्यामुळेच युती होणार की टिकणार हा मुद्दा सार्वजनिक चर्चेत आहे. लग्न असोत कीर्तन त्यावेळी जनता युतीवर बोलत आहे.

अशावेळी एकाने सुपारीच्या कार्यक्रमात दिलेली प्रतिक्रिया बोलकी वाटते. तो शिक्षक म्हणाला की, ‘सध्या राजकारण म्हणजे ९० टक्के नालायक माणसांचा भरणा. आपल्याला फक्त ९१ कोण आणि ९२ टक्के नालायक कोण याची निवड करून मतदान द्यायचे आहे. सेना नाटकं करील. पण शेवटी भाजपच्या वळचणीला जाईल. नाहीतर तो पक्ष फुटेल. म्हणून युती नक्कीच होणार..!’

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*