महसूल मंत्र्यासंबंधी जमीन घोटाळ्यावरुन विरोधक आक्रमक

चौकशी करण्याची धनंजय मुंडेंची मागणी, गोंधळामुळे कामकाज तहकुब

मुंबई :

पुण्यातील दोन जमीनीच्या माध्यमातून महसूल मंत्र्यांचा कोट्यावधी रुपयांचा घोटाळ्याचा विषय विधान परिषदेत आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित करुन चौकशीची मागणी केली. या मुद्यावर विरोधक आक्रमक झाल्याने आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या गोंधळामुळे सभापतींनी दिवसभराचे कामकाज तहकूब केले.

पुण्यात शिवप्रिया रिअल्टर्स यांच्या संदर्भातील बालेवाडी सर्व्हे क्र. 18/2 वगैरे जमीनीबाबतच्या आदेशाला महसूल मंत्र्यांनी बेकायदेशीर स्थगिती दिल्याचा व त्याव्दारे विकासकाला 300 कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी नियम 289 अन्वये प्रस्ताव मांडून केला. अशाच प्रकारे पुण्यातीलच म्हातोबा देवस्थानच्या इनामी जमिनीबाबतही असाच प्रकार झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. या प्रकरणात 42 कोटी रुपये कर व्यावसायीकाला माफ करण्यात आला असून या दोन्ही प्रकरणात शासनाने भुखंडाचे आरक्षण बदलून व व्यावसायीकाला महसूल भरण्यास सूट देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. या दोन्ही प्रकरणाची चर्चा करण्याची व चौकशी करण्याची मागणी केली.

याचवेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी जोरदार गोंधळ केल्याने या गोंधळातच सभागृहाचे कामकाज सभापतींनी दिवसभरासाठी तहकूब केले. भ्रष्टाचाराचे प्रकरण दाबण्यासाठीच सत्ताधारी पक्षाचे आमदारांनी गोंधळ घातल्याचा आरोप मुंडे यांनी नंतर वृत्तवाहीण्यांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*