पावसाळी पर्यटन | टोलनाक्यावर चिंब भिजा नाणेघाटात..!

मित्रांनो, पावसाळी पर्यटनासाठी कुठं.. कुठं.. जायचे याचे बेत रचणाऱ्यांसाठीचा सुगीचा हंगाम येऊन ठेपलाय. मस्त खात.. पीत आणि मजा मारीत सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर फिरण्याचे डोस्क्यात आहे ना..? मग नाणेघाटात जाऊन या की..!

प्राचीन काळातील टोलनाका म्हणून नाणेघाटाची ओळख अजूनही शाबीत आहे. त्यामुळेच या ऐतिहासिक महत्व असलेल्या ठिकाणी चिंब भिजण्याची मज्जा वेगळी आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम टोकाला असलेला नाणेघाट हा परिसर पावसाळी पर्यटकांसाठी पर्वणी आहे. प्राचीन सातवाहन साम्राज्याच्या काळातील पैठण ते नालासोपारा या आर्थिक राज्यमार्गावरचा हा घाटरस्ता होता. नाणेघाटात व्यापारी व नागरिकांना जकात कर द्यावा लागायचा. त्यासाठी इथे मोठे रांजण होते. प्राचीन अनुभूती देतानाच अतिशय रमणीय असा हा परिसर सकारात्मक जीवनाची प्रेरणा देतो.

अख्खा परिसर ढगांनी झाकून जातात आणि मग हे पावसाळी ढग बाजूला होतात, असा पाठशिवणीचा खेळ इथे नित्याचाच असतो. तसेच आजूबाजूच्या सह्याद्रीच्या डोंगरावरून कोसळणारे असंख्य धबधबेही डोळ्याचे पारणे फेडतात. कल्याणला गेलेल्या विजेच्या उच्च दाबाच्या तारा घाटातून खाली नेलेल्या आहेत. पावसाळ्यात सगळीकडे धुके पसरल्यावर या तारांच्या भोवती मंडल (करोना) दिसते. त्यावरून रस्ता शोधता येतो. प्राचीन टोलनाक्याच्या खुणा आजही मोठ्या दगडी रांजणाच्या रूपाने अजूनही पाहायला मिळतात. शेजारीच जीवधन किल्ला आहे. याच किल्ल्याचा भाग असलेला वांदरलिंगी सुळका पर्वतारोही मंडळींना खुणावत असतो. आपापल्या वकुबानुसार प्रत्येकाने कुठे भटकायचे तो निर्णय घेऊन इथे एन्जॉय करावा.

पुणे शहरातून जुन्नर-आपटाळे मार्गाने नाणेघाटात जायला १३० किलोमीटर अंतर आहे. तर, मुंबईहूनही माळशेज घाटातून ओतूर-गणेशखिंड-जुन्नर या मार्गाने नाणेघाटात जात येते. येथे सातवाहनांची राणी नागनिका हिने कोरलेले अप्रतिम लेणे आहे. लेणीच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर ब्राह्मी लिपीमध्ये शिलालेख आहेत. राणीचे यज्ञ व दिलेले दाने यांची मोठी जंत्री लेखात आहे. लेणीच्या डोक्यावरच्या नानाचा अंगठा या डोंगरावर जायला शेजारून रास्ता आहे. पावसाळ्यात या निसरड्या वाटेवरून जपून जावे. आणि दाट धुके असल्यास धुक्यामुळे दरीचा अंदाज येत नसताना वरती जाऊच नये.

पावसाळी असो की इतर वेळेची भटकंती असोत, अशावेळी कायमच सावध असायला हवी. कारण सुरक्षितता सगळ्यात जास्त महत्वाची. परतीच्या वाटेत चावंड किल्ला आहे. तिकडे जायला उत्तम लोखंडी जिना बांधलेला आहे. किल्ल्यावर जमिनीलगत पाण्याच्या सात टाक्या खोदलेल्या आहेत. किल्ल्यासमोरच पूर गावच्या रस्त्याने २ किलोमीटर आत गेल्यावर कुकडी नदीच्या उगमापाशी आपण पोहचतो. इथे अंदाजे १२-१३ व्या शतकात बांधलेले कुकडेश्वराचे देखणे असे मंदिर आहे. भटकंती झाली की मासवाडी नावाचा शाकाहारी व लज्जतदार अन्नपदार्थ जुन्नर-नारायणगाव भागात खाऊन ही भटकंती पूर्ण करावी.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*