म्हणून महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर : मुख्यमंत्री

मुंबई :
महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे सकारात्मकतेने कार्य करुन राज्याला विविध आघाड्यांवर देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केले.

सर्वसमावेशकता आणि सकारात्मकता, प्रामाणिकता, पारदर्शीपणा या माध्यमातून वारीत सहभागी झाल्याची भावना मनात ठेवून राज्याचे विविध प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. विदर्भ-मराठवाडा अनुशेष, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना झालेली मदत, जलयुक्त शिवार सारखे महत्वाचे प्रकल्प, त्यासाठी मिळालेली जनतेची साथ, सिंचन प्रकल्प, वीजपंप वाटप अशा विविध बाबींचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख करुन हे कार्य करत असताना समाधान लाभल्याचे सांगितले.

त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या कारकीर्दीचा आढावा घेताना अध्यक्षांनी या पदाची महती अधिक वाढविण्याचे कार्य केले असल्याचे सांगून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच उपाध्यक्षांचेही त्यांनी आभार मानले. या ठरावावर उपाध्यक्ष विजय औटी, मंत्री सर्वश्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते जयंत पाटील, सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, जीवा पांडु गावीत यांनीही अध्यक्षांबद्दल आपले विचार व्यक्त केले. त्यावर मा. अध्यक्षांनी लोकशाहीच्या मंदिराच्या पायरीच्या दगडाला मंदिराच्या कळसापर्यंत आणून ठेवल्याबद्दल सर्व सहकार्यांचे आभार मानले.

अंतिम आठवडा प्रस्तावातील मुद्यांवर मंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, जयकुमार रावल, गिरीष महाजन, आशिष शेलार, डॉ. परिणय फुके यांनीही आपले विचार व्यक्त केले.

अधिवेशनातील कामकाज
या अधिवेशनात एकूण 12 दिवस कामकाज झाले असून त्याचा अवधी 100 तास 16 मिनिटे आहे. एकूण 26 विधेयके संमत झाली. एकूण 8 हजार 24 तारांकित प्रश्न प्राप्त झाली होती. त्यापैकी 711 स्वीकृत करण्यात आली तर 53 प्रश्नांची चर्चा झाली. एकूण 80 लक्षवेधींपैकी 43 लक्षवेधींवर चर्चा झाली. अशासकीय विधेयके, 293 अन्वये चर्चा, अंतिम आठवडा प्रस्ताव आदींवरही चर्चा झाली.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*