पावसाळी पर्यटन | चला, देवकुंड धबधब्याला जावू या..!

रायगड जिल्ह्यातील देवकुंड नावाचा धबधबा तरुणाईला खुणावत असतो. पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असलेला धबधबा तरुणाईच्या अकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. धबधब्यावर जाण्यासाठी फिटनेस टिकून असणे अत्यंत गरजेचे आहे. डायनोसॉरच्या काळातील महाकाय अजगाराने टाकलेल्या काते सारखा वाटणारा धबधबा निसर्गाचा अदभुद चमत्कार आहे.

देवकुंड नावाचा धबधबा कुठे आहे ?

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात देवकुंड नावाचा धबधबा आहे. तालुक्याच्या दक्षिणेला पाटणूस नावाची ग्रामपंचायत आहे. पाटणूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत भिरा नावाचे गाव आहे. उन्हाळ्यातील सर्वाधिक ४६.५ अंश सेल्सियस तपमान भिरा परिसरात नोंदवले गेले होते. तपमान बदलामुळे भिरा परिसरातील साजे व रेवाळजे गावातील काजूची झाडे करपली होती. याच भिरा गावात पोहचल्यानंतर अंदाजे दीड ते दोन तासांचा ट्रेक केल्यानंतर देवकुंड धबधब्यावर पोहचता येते.

काय करु नये ?

देवकुंड धबधबा पाहण्यासाठी लहान मुलांना घेवून जावू नये. येवून जावून चार तास चालण्याची तयारी असेल तरच जाण्याचा निर्णय घ्यावा.

पुणे शहरातून देवकुंड धबधाब्यावर कसे जायचे ?

चांदणी चौकातून अंदाजे ७० कि. मी अंतरावर भिरा परिसर आहे. चांदणी चौक – पिरंगुट – पौड – माले- मुळशी- चाचवली – वारक – निवे सारोळे – ताम्हिणी घाट परिसर उतरल्यानंतर विळे भागाड नावाचा एम.आय.डी
सी. परिसर येतो. विळे भागाड येथून पाली रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन अंदाजे ९ कि.मी गेल्यानंतर भिरा गावात पोहचता येते.

भिरा गावात पोहचल्यानंतर काय करायचे ?

ग्रामस्थांच्या वतीने गाड्यांच्या पार्कींगची व्यवस्था केली आहे. दुचाकी वाहनासाठी पार्कींगचा दर ३० रुपये आहे. धबधब्याला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून १० रुपये प्रवेश कर घेतला जातो. लागलीच गाड्या पार्क करुन प्रवेश कराची पावती घ्यावी. थोडा वॉर्म अप करुन गाईड शोधण्यास सुरवात करावी.

गाईड पाहीजेच !

पर्यटकांच्या गर्दी मुळे स्थानिक युवा गाईडचे काम करतात. एका गृपकडून कमीत कमी ५०० रुपये फी गाईड घेतो. जंगलातून वाट असल्याने गाईड घेणे नितांत गरजेचे आहे. एखाद्या गृपच्या मागे मागे जावू असा विचार करणार असाल तर तो करु नका . गाईड एखाद्या गृपला घेवून कधी दुसऱ्या वाटेने निघून जाईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही. जंगलातील वाट असल्याने चालताना जखम झाली, एखादा किडा चावला तर त्यावर गाईडकडे लागलीच नैसर्गिक उपाय असतात. काय करावे व काय करु नये याच्या सुचना गाईड वारंवार देत असतो.धबधब्यावर पोहचल्यानंतर पाण्यात किती फुट जायचे , कसे जायचे याचीही माहिती गाईडकडे असते. धबधब्यातील पाण्यात उतरण्यापुर्वी गाईडच्या सुचना लक्षपुर्वक ऐकाव्यात. विना अपघात देवकुंड धबधब्याला भेट द्यायची असेल तर गाईडची नितांत गरज आहे.

देवकुंडला निघण्यापुर्वीची तयारी

१) दु-चाकी वर जाणार असाल तर गाडीची स्थिती प्रामुख्याने चाक व ट्युबची स्थिती तपासून घ्यावी. 
२) पावासाळी पर्यटनासाठी बॅगेचे वजन हलकेच ठेवावे. बॅगेत टॉवेल , अतिरीक्त अंतर्वस्त्र , अतिरिक्त टी शर्ट, शॉर्ट, पाण्याची बाटली, चप्पल ( सॅंडेल) व रेंनकोट असणे गरजेचे आहे. 
४) भिरागाव ते देवकुंड धबधबा अंतर दीड ते दोन तासांचे आहे. दोन तास चालून धबधब्यावर पोहचल्यावर भुक लागते. त्यामुळे बॅगेत घरगुती व्हेज बिर्याणीचा डबा ठेवल्यास उर्जा टिकून राहण्यास मदत होते.
३) मुलायम टी शर्ट व लवकर वाळेल अशी शॉर्ट असेल तर शरीरातील गरमपणा टीकून राहतो. 
४) स्पोर्ट शुज अथवा पावसाळी शुज असला तरी चालेल. परंतू त्याला ग्रीप असणे गरजेचे आहे.
५) मोबाईल क्रांतीच्या युगात धबधब्यावरुन जगाशी कनेक्ट रहायचे असेल तर मोबाईलला रेंज आहे. वॉटरप्रूफ मोबाईल असेल तर घेवून जाण्यास हरकत नाही.
६ ) पुण्यातून सकाळी ७ वा निघणे गरजेचे आहे. सकाळी ७ वा निघाल्यानंतर सायंकाळी ७ च्या आत घरी येणे शक्य आहे.
७) दुचाकी शेयर करुन जाणार असाल तर अंदाजे ६०० रुपये प्रतीव्यक्ती खर्च अपेक्षीत आहे.अपेक्षीत खर्चात तीन वेळेचा चहा , दोन वडापाव , एक भजीप्लेट, दुपारचे जेवन , पेट्रोल , गावातील पार्कींग व प्रवेश कर आदी बाबींचा समावेश आहे.

परतीच्या प्रवासात घ्यावयाची काळजी..

दुपारी २ वा भिरा येथून परतीच्या प्रवासाला सुरवात झालीच पाहीजे. परतीच्या प्रवासात थकवा आलेला असतो. अंग गरम होण्याची क्रिया संथ पध्दतीने होते. परिणामी अंग अखडण्याची शक्यत असते. त्यामुळे परतीच्या प्रवासात सोबत घेतलेले अतिरीक्त कोरडे कपडे घालावेत व त्यावर रेनकोट घालावा.

सुचना

शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असल्याने पर्यटकांची गर्दी असते. कुटूंबासोबत जाणार असाल तर इतर दिवशी देवकुंडला भेट देणे योग्य ठरते. धबधब्याचा मनमुराद आनंद घेता येतो. 
जुलै महिन्याच्या शेवटी अथवा ऑगस्ट महिंन्याच्या सुरवातीच्या शनिवार रविवार देवकुंडला जाण्याचे नियोजन करतो आहे. माझ्या सोबत येण्यासाठी कोणी इच्छुक असेल तर माझ्या पुढील क्रमांकावर whts app मेसेज करावा. मो. क्र : ७७१९८६००५८

लेखक : विशाल केदारी, कृषी पत्रकार

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*