खेकड्यांनी फोडले तिवरे धरण; क्लिनचिटसाठी मंत्र्यांचे नवीन पिल्लू..!

मुंबई :

आपल्या पक्षातील किंवा इतर पक्षातील राजकीय सहकाऱ्याला क्लीनचिट देण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महारत आहे. तोच कित्ता आता जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी गिरवला आहे. तज्ज्ञांच्या चौकशी अहवालापूर्वीच त्यांनी तिवरे धरण खेकड्यांनी फोडल्याचे सांगत आमदार सदानंद राऊत यांच्या ठेकेदार कंपनीला क्लीनचिट दिली आहे.

चिपळूण तालुक्यात १८ वर्षापूर्वी बांधलेलं तिवरे धरण मंगळवारी फुटल्याने पाण्याच्या लोंढ्यात २५ लोक वाहून गेले. त्यापैकी काहींचे मृतदेह अजूनही शोधले जात आहेत. अनेकांचे संसार वाहून नेणाऱ्या या दूर्घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न महाराष्ट्रासमोर उभा असतानाच आता शिवसेना आमदार राऊत यांच्यासाठी खासदार विनायक राऊत व मंत्री सावंत सरसावले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलेले असतानाच सावंत यांनी चौकशी पूर्ण करून अहवाल दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे की, कोकणात खेकड्यांची संख्या खुप आहे. याच खेकड्यांनी धरणाच्या भिंतीला भोकं पाडल्याने तिवरे धरण फुटले. अधिकारी म्हणतायत खेकड्यांनी भोकं पाडल्यामुळे धरण फुटलं. मग खेकड्यांवर गुन्हा कसा दाखल करायचा असा बिनतोड सवाल राज्यमंत्र्यांनीच उपस्थित केल्यामुळे हे प्रकरणच निकालात निघालात जमा आहे.

सावंत हे सरकार मध्ये मंत्री आहेत, ते इंजिनियर आहेत. शिवाय त्यांच्या नावापुढे डॉक्टर, प्राध्यापक अशा उपाधी लागतात. म्हणून त्यांनी जो निष्कर्ष काढलाय त्यावर विश्वास ठेवायला हवाच की. आता सरकारपुढे काय पर्याय आहेत, एक तर खेकड्यांवर गुन्हा दाखल करावा, कोकणातच कशाला घाटावर पण खुप खेकडे आहेत म्हणून महाराष्ट्रातील धरणातून खेकडे नामशेष करण्याची एखादी महात्त्वाकांक्षी मोहीम हाती घेता येते का याचा विचार सरकारला नक्की करता येईल…

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*