पारनेर विधानसभा | औटी-लंके यांच्यासह संदेश कार्ले रिंगणात..?

अहमदनगर :

राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, याचाच प्रत्यय वेळोवेळी येत असतो. आताही मागच्या निवडणुकीत पारनेर-नगर विधानसभेची जागा शिवसेना पक्षाकडे ठेवण्यासाठी एकत्रितपणे लढणाऱ्या तिघांमध्येच या जागेसाठीची लढत रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्यासमोर राष्ट्रवादीत गेलेल्या निलेश लंके यांनी आव्हान उभे केलेले असतानाच आता नगरमधील जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनीही निवडणुकीची तराई सुरू केली आहे.

मागील निवडणुकीत आमदार औटी यांच्या विजयासाठी शिवसेनेचे तत्कालीन तालुकाप्रमुख म्हणून लंके (पारनेर) व कार्ले (नगर) यांनी जोरदारपणे काम केले होते. येथून मोदी लाटेतही सेनेचा आमदार निवडून आणण्याची किमया जिल्हा शिवसेनेने केली होती. मात्र, औटी यांच्याकडून शिवसैनिकांचा अपेक्षित सन्मान राखला जात नसल्याची भावना १० वर्षांत कमी होऊ शकली नाही. त्यातच लंके यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केले. त्यांनी आगामी विधानसभेसाठी जोरात तयारी केली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या अंतर्गत विरोधात लंके यांच्याकडील बेरीज कशी जुळणार असाच प्रश्न आहे.

पारनेर तालुक्यातील सेनेच्या विजयात मोठा वाटा नगर तालुक्यातील मतदारांचा असतो. यंदा त्यात औटी विरुद्ध लंके अशी फुट पडण्याची चिन्हे असतानाच जिल्हा परिषद सदस्य कार्ले यांनी निवडणुकीची तयारी केल्याने शिवसैनिक सध्या संभ्रमात आहेत. कार्ले यांचा संपर्क व जनाधार मोठा आहे. जिल्हा शिवसेना कार्ले यांच्याबरोबर आहे. तर, लंके यांना जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच औटी यांनाही आता कार्ले यांच्या रूपाने पक्षांतर्गत तगडा प्रतिस्पर्धी पुढे आला आहे. अशावेळी पारनेर-नगरचा तिढा जास्त वाढला आहे. त्यातून कोणता नेता कसा मार्ग काढणार यावर येथील विजयाचे गणित ठरणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*