तर भाजपची स्वबळाचीही असेल तयारी..!

पुणे :

प्रेमात आणि युद्धात सगळेच माफ असते, तर राजकीय युद्धात त्याच्याही पुढे जाऊन सगळे काही थापही असते. याचाच प्रत्यय अनेकदा महाराष्ट्राने घेतला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही मागच्या खेपेप्रमाणेच ऐनवेळी राज्यात तिरंगी किंवा चौरंगी लढाई होण्याची शक्यता आहे.

१४४:१४४ अशा गणितानुसार सत्ताधारी भाजप-शिवसेना यांची बोलणी सुरू झाल्याचे चित्र आहे. मात्र, हेच चित्र आभासी आहे की वास्तव, याचे कोडे महाराष्ट्राला पडले आहे. कारण सेनेशी घरोबा करून लढण्याच्या आणाभाका घेतानाच भाजपने आपल्या २८८ मतदारसंघातील इच्छुकांना तयारीला लागण्याचे निरोपही देऊन टाकले आहेत. हे ऐनवेळी होणारा दगाफटका टाळण्यासाठी असल्याचे काहीजण सांगतात. तर काहीजण सेनेची जागा असूनही आम्हालाच उमेदवारी मिळण्याच्या थाटात तयारीला लागल्याने संशयाला हवा मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर आणि आता त्यानंतर मराठा आरक्षणामुळे होणाऱ्या फायाद्यासह निवडणुकीत उतरण्यासाठी भाजपने विविध सर्वेक्षण संस्थांना कामाला लावले आहे. त्यानुसार चाचपणी करून राज्यात स्वबळावर सत्तेसाठी संधी असल्याचे अहवाल प्राप्त झाल्यानेच आता सर्व जागांसाठी तयारीला लागण्याचे संदेश मुंबई व नागपूरहून दिल्याचे काही इच्छुक सांगत आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामुळे वाढलेली ताकद आणि हिंदुत्ववादी मंडळींची प्रचारातील साथ लक्षात घेऊन भाजपने एकहाती किमान १७० जागा जिंकण्याचे स्वप्न ठेवले आहे. युती करून लढल्यास भाजपचे स्वप्न दिवास्वप्न ठरणार आहे. तर, स्वबळावर लढल्यास भाजपला सेनेसह कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह वंचितशीही दोन हात करावे लागतील. अशावेळी काय निकाल हाती येणार याचे गणित कागदावर पक्के करूनच राष्ट्रीय भाजप पुढील निर्णय देऊ शकते.

निवडणूक तयारीत भाजप सगळ्यांच्या खूप पुढे आहे. तर, सेना भाजपच्या भरोश्यावर आहे. राष्ट्रवादीची तयारीही जोमात आहे. तर, कॉंग्रेस अजूनही तोऱ्यात येऊ शकलेली नाही. वंचितला इतर पक्षांनी उमेदवारी न दिलेले अनेकजण मिळतील याची अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांची टीम काम करीत आहे. अशावेळी भाजपच्या भूमिकेवरच राज्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*