बचत गटांमुळे गावांचा आर्थिक विकास : येरावार

यवतमाळ :
‘चूल आणि मूल’ या संकल्पनेतून महिला बाहेर पडून आर्थिक प्रगती करीत आहेत. मुलाचे शिक्षण, मुलीच्या लग्नाचे नियोजन हे महिलांद्वारे योग्य प्रकारे होत असल्यामुळे कुटुंबाच्या ख-या अर्थमंत्री महिलाच आहे. त्यातच आता महिला बचत गटांचे जाळे गावागावात विणले गेले आहे. त्यामुळे गावांचा आर्थिक विकास हा महिला बचत गटांमुळे होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. मंचावर जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी, सहाय्यक नियोजन अधिकारी सायली देवस्थळी, रेखा गुरव, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे आदी उपस्थित होते.

खेडे समृध्द तर भारत समृध्द, असे महात्मा गांधीजींचे वचन होते, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यांत्रिकीकरण आणि पाश्चिमात्य संस्कृतीमुळे शहरीकरण वाढले. बाजुच्या बांगलादेशात मोहम्मद युनूस यांनी महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला. तेथून ही चळवळ सुरू झाली. बचत गटांना शासन सर्वोतोपरी मदत करीत आहे. पांढरकवडा येथे पंतप्रधानांनी घेतलेल्या महिला मेळाव्यात राज्य सरकारने बचत गटाचा फिरता निधी वाढविण्याचा निर्णय घेतला. घरातील महिला उद्योगासाठी समोर येत आहे, ही गौरवाची बाब आहे. त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे सहकार्य मिळत आहे.

मार्केटिंग, ब्रँडींग आणि पॅकेजिंगचे हे युग आहे. महिला बचत गटाचे कार्य कौतुकास्पद असले तरी ते अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. बचत गटाच्या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच त्यांचा उत्पादीत माल विकण्यासाठी शहरात इमारत पूर्णत्वास येत आहे. केंद्र आणि राज्य शासनाने अल्पसंख्यांक महिला बचत गटांसाठी वेगळी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मानव विकास मधूनसुध्दा बचत गटासाठी दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते धानोरा येथील वर्षा पाटील, रंजना मेश्राम, सुलोचना राऊत, रेखा चव्हाण यांना व्यवसायासाठी धनादेश देण्यात आला. तर शारदा महिला बचत गट, उत्कृष्ट व्यवसायिका मिना दामोदर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन सुनंदा मानकर यांनी तर आभार डॉ. रंजन वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या अध्यक्षा, गावविकास समितीच्या अध्यक्षा यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*