मुख्यमंत्री साहेब, जन्मभर तुमचा ऋणी राहीन…

मुख्यमंत्री साहेब, नऊ वर्षात कुणी दखल घेतली नाही. तुम्ही ऐकून घेतलं. प्रशासनाला निर्देश दिले. जन्मभर तुमचा ऋणी राहीन. मंत्रालयातील लोकशाही दिनात हिंगोली जिल्ह्यातील वडगाव येथील नागोराव तरटे यांनी ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया व्यक्त केली.

मंत्रालयात आज 112 वा लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी शहापूर, यवतमाळ, लोहारा (उस्मानाबाद), अंधेरी, हिंगोली, ठाणे, शहाड, कोल्हापूर, कल्याण, मुंबई, अंबाजोगाई, अहमदनगर, रायगड, परभणी, पुणे येथील नागरिकांच्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली. आतापर्यंत झालेल्या लोकशाही दिनात 1525 तक्रारी प्राप्त झाल्यासून 1524 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. यावेळी हिंगोली जिल्ह्यातील वडगाव येथील श्री. तरटे मंत्रालयात उपस्थित होते. त्यांनी स्वमालकीच्या जागेवर आणि सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण झाल्याची तक्रार केली होती. त्यावर तातडीने अतिक्रमण काढून जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री करून पंधरा दिवसात सपाटीकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. त्यावेळी श्री.तरटे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

अशाच प्रकारची भावना अंबाजोगाई येथील दत्तप्रसाद रांदड यांनी व्यक्त केली. त्यांनी जमिनीच्या नोंदीची पडताळणी करून सत्ता प्रकार 1 अभिलेखात नोंद घेण्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यावर महिनाभरात कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधताना श्री. रंदाड आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, लोकशाही दिनाच्या माध्यमातून सामान्य माणसाला मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळाल्या बद्दल आभारी आहे.
सोनपेठ जिल्हा परभणी येथील बाळू दुगाने यांनी जमिनीचा पेरा बँड केल्याबाबत तक्रार दाखल केली होती, त्यावर संबंधित तक्रारदाराची नोंद सात ब मध्ये घेवन तहसीलदाराकडे सुनावणी घ्यावी आणि ती महिन्याभरात पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच सामान्य माणसावरचा अन्याय दूर करा असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. सामान्य नागरिक इथंपर्यंत येतो त्याची तक्रार दूर झाली पाहिजे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला केल्या.

लोहारा जि. उस्मानाबाद येथे कमी दाबाची समस्या जाणवत असून तेथे तीन महिन्यात नवीन उपकेंद्र कार्यान्वित होणार असून त्यानंतर ही समस्या भेडसावणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

(प्रेस नोट : माहिती संचालनालय, महाराष्ट्र शासन)

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*