विशेष | रामदास बोट दुर्घटना

आज 17 जुलै. टायटॅनिक जहाजाचा इतिहास कुतुहलाने नेहमीच चाळला जातो. पण भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात झालेल्या ‘रामदास’ या बोटीच्या अपघाताविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. १७ जुलै १९४७:- “एस एस रामदास” बोट दुर्घटना. करुण दुर्घटनेला आज 72 वर्षे पूर्ण होत आहेत. याच दुर्घटनेची ही स्मरणकथा…

लेखक : योगेश शुक्ला (जळगाव, महाराष्ट्र)

स्वातंत्र्यपूर्व काळात दळणवळणाच्या साधनांची कमतरता असल्याने सागरी वाहतुकीचा मार्गच जनतेला स्वस्त आणि सोयीचा होता. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग १९३६ मध्ये तयार झाला तरी जनतेला बोट वाहतूकच सोयीची वाटे. त्याकाळी कोकण किनारपट्टीवरून प्रवासी व मालवाहतूक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने नजीकच्या कुलाबा व रत्नागिरी जिल्हय़ातील सर्व छोटी बंदरे बारमाही वाहतुकीमुळे सतत गजबजलेली असणे हेच कोकणचे खरे वैभव होते.
कोकणातील घरचे कर्ते पुरुष व्यवसायानिमित्त मुंबईत आश्रयाला असले तरी संपूर्ण कुटुंब कोकणात गावाला असल्याने चाकरमान्यांचा प्रवास जलमार्गेच असे. आज नामशेष झालेला गलबत व्यवसाय त्याकाळी व्यापारी मालाची वाहतूक करण्यात आघाडीवर होता. पावसाळय़ात फक्त मुंबई शेजारील जलवाहतूक सुरू असायची. कमी वेळात व पैशात प्रवास घडत असल्याने सतत कुलाबा व रत्नागिरी जिल्हय़ातील आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशांची ये-जा सुरूच असायची. रेवस, करंजा, उरण, चौल, रेवदंडा, अलिबाग, श्रीवर्धन, दिघी, रोहा, म्हसळा तसेच खेड, मंडणगड, दाभोळ व चिपळूण येथील सर्व मंडळी मुंबईत गिरगाव, भायखळा, लालबाग व परळ या गिरणगावात आश्रयाला होती. परिणामी दर आठवडय़ाला त्यांचा बोटीने गावाला येण्या-जाण्याचा प्रवास असे, तोही रामदासच्या शनिवारच्या विशेष फेरीने!

कोकण किनारपट्टीवर मुंबई ते गोव्यापर्यंत बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन (बी.एस.एन.) या कंपनीद्वारे रामदास, रोहिदास, जयंती व चंपावती या बोटी प्रवासी वाहतूक करीत असत. रामदास बोट मुख्यत: मुंबई ते गोवा मार्गावर नियमित फे-या करीत असे. तर शनिवारी फक्त रेवसची छोटी फेरी करीत असे. अशातच भारतीय स्वातंत्र्याच्या एक महिना अगोदरची सकाळ मात्र कोकणवासीयांवर घाला घालणारी ठरली. तो दिवस म्हणजे १७ जुलै १९४७, शनिवार व दीप अमावस्येचा होता.
मुंबईच्या भाऊच्या धक्क्यावरून रेवसला निघालेली ‘रामदास’ ही प्रवासी बोट मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या काशाच्या खडकाजवळ वादळात एका महाकाय लाटेची शिकार झाली. तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणार्‍या सुमारे हजारभर प्रवाशांपैकी सुमारे ६२५ जण समुद्रात बुडून मरण पावले. या भीषण दुर्घटनेतून २३२ उतारूंचा सुदैवाने जीव बचावला.
‘रामदास’ ही उच्च खानदानीतील १९७९ फूट लांब, २९ फूट रुंद व ४०६ टन वजनाची. १९३६ मधील स्कॉटलंड बनावटीची, १९४२ मध्ये युद्धकार्यासाठी सरकारने घेतली होती. पावसाळी दिवस असूनही स्वच्छ हवामान असल्याने बोट नेहमीप्रमाणे आपल्या रेवसच्या सफारीला मुंबईहून सकाळी ८.३० वा. निघाली. वाफेवर चालणा-या या बोटीने सुमारे ९ सागरी मैल अंतर पार करून अर्धा तास झाला होता. बोट खुल्या समुद्रात मार्गक्रमण करताना काहीशी तिरकी चालत होती. साधारणत: रेवसला इतके लोक मुंबईहून एका वेळेस कधीच जात नसत. पण १७ जुलै १९४७ रोजी गटारी अमावस्या असल्याने त्या दिवशी गावातील घरी जाण्यासाठी उतारूंची खूप गर्दी झाली होती. सुमारे ६७३ तिकिटे संपली होती. अधिक खलाशी, हॉटेल कर्मचारी व अधिकारी मिळून ७० जण, त्याचप्रमाणे ऐन बोट सुटताना उडय़ा मारणारे फुकटे प्रवासी व तान्ही बालके आदींसह सुमारे ८०० प्रवासी बोटीत होते.
नेमके याच वेळी काळाने घाला घातला. अचानक हवामानात बदल झाल्याने ताशी ५० मैल वेगाने जाणारे चक्रीवादळ निर्माण झाले. परिणामी जोरदार लाटा, वेगवान वारा व पाऊस यांनी रौद्र रूप धारण केले.बोटीचे कापडी पडदे फाटून त्यातून पावसाचे पाणी आत येऊ लागले.काय होते हे कळायच्या आतच बोटीत पाणी शिरले व बोट बुडून समुद्रतळाच्या दिशेने जाऊ लागली. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. सुमारे ६२५ जण बुडून मरण पावले व २३२ प्रवाशांचा सुर्दैवाने जीव बचावला. सुमारे ७५ प्रवाशांचे प्राण तेथील स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. बोटीत अनेक स्त्रिया, पुरुष व बालके होती. दुर्घटनेतील मृतांचे मृतदेहदेखील सापडले नाहीत. ज्यांचे सापडले त्यांची ओळख पटत नव्हती, तर अनेक मृतदेह माशांनी खाल्ले होते. या बोटीतील प्रवाशांपैकी ज्यांना उत्तम पोहता येत होते, ते त्या दिवशी दुपारी तीन वाजता ससून डॉकच्या किनार्‍याला लागले. बोटीचे कप्तान शेख सुलेमान व चीफ ऑफिसर आदमभाई खिडकीतून बाहेर पडल्याने वाचले. शेख पोहत रेवसला गेले व तेथून अलिबाग गाठून त्यांनी मुंबई कार्यालयात तार केली. त्याच दरम्यान पांडू कोशा कोळी हा प्रवासी पोहत मुंबईला पोहोचला. त्यांच्याकडूनच या अपघाताची माहिती मुंबई बंदरातील अधिकार्‍यांना मिळाली. नाहीतर तोपर्यंत या गंभीर घटनेची कोणाला गंधवार्ताही नव्हती. रामदास बोटीतून प्रवास करणारे बहुतांश लोक हे परळ, लालबाग या गिरणगाव परिसरातील तसेच गिरगाव भागातील होते. हे सारे मूळ कोकणवासी असल्याने रामदास अपघातातील हानीमुळे मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी जिल्ह्याची सारी कोकणपट्टी हवालदिल झाली होती. महाराष्ट्राच्या व देशाच्या प्रवासी जलवाहतुकीच्या इतिहासातील एक भीषण दुर्घटना अशी नोंद झालेल्या रामदास बोटीच्या अपघातानंतर प्रवासी जलवाहतुकीबाबतच्या नियमांत आमुलाग्र सुधारणा झाल्या.
इकडे रेवस बंदरातसुद्धा याबद्दल काहीच कल्पना नव्हती. १७ जुलै १९४७ च्या सकाळी रेवस येथून मुंबईला रोजच्या प्रमाणे ताजी मासळी घेऊन कोळ्यांची गलबते येत होती. नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास काही कोळी पाच गलबते हाकारून निघाले. त्यांच्या गलबतांवर सुमारे दोन हजार रुपयांची (त्यावेळचे २००० रुपये म्हणजे आजचा लाखोंचा माल) मासळी होती. पाच गलबतांचा तांडा मुंबईच्या दिशेने पुन्हा निघाला. रेवसपासून चार-साडेचार मैलांवर त्यांची गलबते आली असतील नसतील तोच त्यांच्या दृष्टीला चमत्कारिक दृश्य दिसले. समुद्राच्या पृष्ठभागावर असंख्य माणसे पोहत असून त्यांच्यातच प्रेते वाहात चालली आहेत, असे भीषण दृश्य कोळ्यांनी पाहिले. त्यांना या प्रकाराचा काहीच उलगडा झाला नाही. एवढी माणसे एकाएकी कुठून आली याचा त्यांना काहीच अर्थ लागत नव्हता. कोळी बंधूंनी आपली गलबते झपाझप त्या बाजूला नेली. जी माणसे समुद्रात पोहत जीव वाचवण्यासाठी धडपडत होती, त्यांना त्यांनी भराभर आपल्या गलबतांवर घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी या कोळी बांधवांनी आपल्या गलबतातील २ हजार रुपयांची मासळी समुद्रात फेकून दिली. माणसाच्या जीवितांपुढे त्यांनी आपल्या मालाची पर्वा केली नाही. हे बुडणारे प्रवासी रामदास बोटीवरीलच होते. कोळी मंडळींनी दृष्टीच्या टापूत दिसतील तेवढ्या माणसांना म्हणजे ७५ जणांना वाचविले.

रामदासच्या दुर्घटनेपूर्वी १९२७ मध्ये तुकाराम व जयंती या बोटींनाही अशाच प्रकारे जलसमाधी मिळाली होती. यात एकूण २ हजार प्रवासी सागराच्या उदरात गडप झाल्याने टायटॅनिकची आठवण येते. या दोन्ही घटना भीषणच पण दोन्हीतील फ़रक म्हणजे टायटॅनिकचे अवशेष शोधायला सुमारे ७३ वर्षे गेली आणि बुडालेल्या रामदास बोटीचे काही अवशेष अपघातानंतर सुमारे दहा वर्षांनी म्हणजे १९५७ मध्ये मुंबईतील बेलॉर्ड पिअरच्या समुद्रकिनार्‍यावर आपोआप वाहात आले होते हे विशेष. सदर दुर्घटनेची कमोडोर मिल्स यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली. बी. एस. एन. कंपनी पुढे सिंदिया कंपनीत विलीन करण्यात आली. बोटीवर वायरलेस यंत्रणा नसल्याचे सिद्ध झाले. परिणामी नंतर मात्र दूरसंचार उपकरणे प्रवासी बोटींवर दिसून आली. तसेच नारळी पौर्णिमेपर्यंत मच्छीमारी बंदीचा कायदाही सरकारने केला. या भीषण दुर्घटनेचे सागरीशास्त्रीय विश्लेषण सागरी जीवनाला वाहिलेले पहिले मराठी मासिक ‘दर्यावर्दी’ने आपल्या ऑगस्ट-सप्टेंबर १९४७ च्या दोन अंकातील लेखांमध्ये केले होते. प्रख्यात चित्रकार रघुवीर मुळगावकर व दीनानाथ दलाल हे दोघे ‘दर्यावर्दी’चे मुखपृष्ठ तयार करीत असत.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*