बिझनेसवाला | ग्रामीण उद्योजकता : एक विवेचन

व्यावसायिक क्षेत्रांमध्ये शहरी उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या या विषयावर विचारमंथन होताना आपण नेहमीच पाहतो; त्यामानाने ग्रामीण उद्योजकांच्या समस्यांवर खूपच कमी चर्चा होते. एकूणच मराठी माणूस हा आधीच नोकरी धार्जिन प्राणी म्हणून ओळखला जातो त्यात ग्रामीण भागातली शैक्षणिक कमतरता, उद्योजकीय ज्ञानाचा आणि मानसिकतेचा अभाव, भांडवलाची कमतरता या गोष्टींची भर पडल्याने सामान्य ग्रामीण मराठी माणूस हा व्यवसायाचा विचारच करत नाही. शेती हा जरी व्यवसाय असला तरी मराठी माणूस शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टीकोनातून पाहत नाही आणि मग शेती हि केवळ उपजीविकेचे साधन बनून राहते. ‘शेतीत काय उरलय?’ म्हणणारे लोक आज आपल्याला गावात खूप मोठ्या संख्येने फिरताना दिसतील मात्र याच शेतीतून देदीप्यमान झेप घेऊन स्टार्टअप क्षेत्रांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या इस्राईलला तेच आश्चर्यचकित होऊन पाहतात.

वाळवंटामध्ये अन्न पिकवून जवळपास साऱ्या जगात अन्न निर्यात करणारा आणि लक्षावधी लोकांचे पोट भरणारा इस्रायल देश हा ग्रामीण उद्योजकतेचा सुंदर नमुना आहे. ग्रामीण उद्योगांच्या अयशस्वी होण्यामागे नेहमीच तीच तीच कारणे पुढे केली जातात, जसे की- भांडवलाचा अभाव. खरेतर भांडवलाचा अभाव ही आजची समस्या नव्हेच! भांडवलाच्या बाबतीत आज असंख्य पर्याय आपल्यासमोर आहेत, या समस्येला आपण भांडवलाच्या ज्ञानाचा अभाव असं म्हणू शकू. जिल्हा उद्योग केंद्राकडून दिले जाणारे आर्थिक सहाय्य, केंद्र शासनाची स्टार्टअप योजना, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना, मागासवर्गीय बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना इ. अशा कितीतरी योजना आज उद्योजकांना सुरुवातीचे आणि चालू अर्थसहाय्य पुरवतात. ग्रामीण तरुणांना खूप कमी प्रमाणात या गोष्टींची माहिती असते. इंटरनेटचा ग्रामीण भागात प्रसार झाला असला तरी करमणुकीच्या माध्यमासाठी याचा जास्त वापर होताना दिसून येतो. म्हणजे आपण असे म्हणू शकतो की संसाधनांचा अभाव ही समस्या नव्हे तर संसाधनाचा चुकीचा वापर ही समस्या आहे.

ग्रामीण भागातील उद्योजकीय मानसिकतेचा अभाव ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे न वाढण्याचे एक कारण आहे आणि त्याला जबाबदार आहे नोकरी धार्जिणी मानसिकता. साधारणपणे एक ग्रामीण युवक पदवीधर होतो तेव्हा तो सर्वात प्रथम स्पर्धा परीक्षांचा विचार करतो, ही परिस्थिती शहरी भागांमध्ये सुद्धा सारखीच आहे. एक सरकारी अधिकारी बनायचे ठरवून तो अभ्यासाला लागतो आणि सरासरी तारुण्यातील चार ते पाच वर्षे तो गुंतून राहतो. आता सरकारी खात्यांमध्ये निर्माण होणाऱ्या जागा पाहता आणि तेथे असलेले इतर आरक्षण पाहता आपण अंदाज लावू शकतो की हा बंदुकीच्या नळीतून तोफेचे गोळे झाडण्यासारखा प्रकार आहे. पदवीधर झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांकडे वळणाऱ्यांची संख्या थक्क करायला लावणारी आहे.

स्पर्धापरीक्षांच्या काही शेकडा जागांसाठी लक्षावधी आवेदने आलेली आपण पाहतो या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आणि या परीक्षेसाठी तयारी करत असलेले विद्यार्थी यांचे जर आपण गुणोत्तर घेतले तर हे काही दशांशामध्ये भरते. म्हणजे आपण म्हणू शकतो की एकूण संख्येपैकी 85 ते 90 टक्के संख्या चार ते पाच वर्षांच्या तयारीनंतर सुद्धा अधिकारी बनण्याची शक्यता नगण्यच असते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना मी निरुत्साही करण्यासाठीही लिहित नाहीये तर उद्योजकीय क्षेत्रांमध्ये असलेल्या अमाप संधीचे या वर्गाने सोन्यात रूपांतर करावे म्हणून लिहीत आहे. या सर्व तयारी नंतर जेव्हा तो एक बेरोजगार म्हणूनच शिल्लक राहतो तेव्हा मात्र त्याच्याकडे या जीवनातील आवश्यक असणाऱी कौशल्ये नसतात. तेव्हा त्याच्याकडे एखाद्या छोट्याशा कंपनीत कमी पगारावर अधिक तास काम करण्याची नामुष्की ओढावते. उद्योग हा या क्षेत्रातील अयशस्वीतासाठीच नव्हे तर दर्जेदारपणे अभ्यास करणाऱ्यांसाठी सुद्धा एक उत्तम आणि तोडीस तोड असा पर्याय आहे.

आता आपण चर्चा करुयात शेती करणाऱ्या युवकांच्या बाबतीत. स्वखुशीने शेती करणाऱ्यांची संख्या तशी नगण्यच असते; अधिकतर तरुण हे शिक्षणामध्ये अपयश आल्यानंतर आणि बाकीचे सर्व पर्याय संपुष्टात आल्यानंतर शेतीकडे वळतात. त्यांच्यासाठी शेती हा व्यवसाय नसतो तर केवळ एक उपजीविकेचे साधन असते. असे असताना सुद्धा त्यांच्याकडे योग्य माहितीचा अभाव दिसून येतो. ग्रामीण युवक हा पारंपारिक शेती करण्यावर अधिक भर देतो Poly House, फ्लावर हार्वेस्टिंग, रेशीम शेती असे कितीतरी पर्याय आज युवकांकडे उपलब्ध आहेत. अशा युवकांमध्ये शेतीच्या बाबतीत व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण होणे गरजेचे आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे ती निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबवताना दिसून येत आहेत.

शेतीमधील उद्योजकता या विषयावर नेहमी इस्राईल चे उदाहरण दिले जाते. वाळवंटामध्ये शेती करून आज एक सक्षम अर्थव्यवस्था आणि जागतिक स्टार्टअप हब म्हणून उभा आहे. पाण्याचा बारकाईने केलेला उपयोग, शेतीला अत्याधुनिक विज्ञानाची घातलेली सांग,ड संकरित आणि संशोधित बि- बियाणे यांचा केलेला पद्धतशीर उपयोग, निर्माण झालेल्या अन्नाचे केलेले परिणाम कारक मार्केटिंग या गोष्टी इस्राईलच्या यशस्वी होण्यामागे महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. शेतीसाठी वापरण्यात आलेल्या प्रत्येक लिटर पाण्याचा आणि पिका मध्ये झालेल्या अंशीक बदलांचा त्यांच्याकडे हिशोब असतो. इस्राईल कडे असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांची आणि भारताकडे असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांची तुलनाही होऊ शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जमीन आणि पाण्याची उपलब्धता आहे. शेतकऱ्यांमध्ये असलेली उद्योजकीय मानसिकता हे त्यांच्या यशस्वी होण्यामागचे मुख्य गमक आहे. आपण त्यांचे अनुकरण जरी केले तरी जमीन आणि पाण्याच्या उपलब्धतेमुळे आपण सर्व जगाला शेतीच्या क्षेत्रामध्ये मागे पाडू शकू हे मात्र निश्चित! आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा भारतीय व्यवस्थेवरिल कलंक इतिहासजमा होऊन राहील.

ग्रामीण उद्योजकतेच्या बाबतीत भविष्याचा आढावा घ्यायचा झाल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे वाढत्या जागतिक लोकसंख्येची भूक. जागतिक लोकसंख्या ज्या दराने वाढत आहे त्याने भविष्यात लवकरच अन्नाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ग्रामीण शेती उद्योग आणि त्यावर आधारित असलेल्या प्रक्रिया उद्योगांसाठी ही गोष्ट प्रेरणादायी आहे. वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी सुधारित शेती आणि अत्याधुनिक अन्नप्रक्रिया उद्योग या माध्यमातून ग्रामीण उद्योजक आपला विकास साधू शकतात. आजच्या घडीला तरी भारतीय अर्थव्यवस्था शेतीवर आधारित अर्थव्यवस्था आहे. भारतातील 60 टक्के लोक हे अजूनही खेड्यात वास्तव्य करून आहेत ह्या लोकांच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून आहे हे सरकारने ओळखले आहे आणि त्यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. परिणाम मात्र अंमलबजावणी वर अवलंबून असतात यात काही वाद नाही.

आधुनिक वैज्ञानिक संशोधन आणि त्याचा प्रत्यक्ष व्यवहारातील उपयोग या गोष्टीत समन्वय साधण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे; अन्यथा तंत्रज्ञान हे सुद्धा केवळ पुस्तकी ज्ञान बनून राहील. ग्रामीण भागातील उद्योगावर परिणाम करणाऱ्या गोष्टी ह्या शहरी उद्योगावर परिणाम करणाऱ्या गोष्टींपेक्षा भिन्न असतात. लोकांचा व्यवसाय कडे बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत क्षीण असतो. आजही व्यवसाय करणे ही गुजराती लोकांची मक्तेदारी समजली जाते. यातून ग्रामीण समाजाला बाहेर पडायला हवे जग हे एक खेडं बनत असताना संकुचित विचार न करता आपल्या खेड्यातून बाहेर पडून स्वतःच्या क्षमतांचा अधिकाधिक उपयोग करून येणाऱ्या उद्योजकीय संधीचे सोन्यात रूपांतर करायला हवे.

लेखक : शेख रियाझ, बिजनेसवाला, लातूर
मो. 7378926295

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*