मंजुषा गुंड यांच्यामुळे रोहित पवारांसमोर आव्हान

अहमदनगर :

नगर जिल्ह्यामधील सर्वाधिक चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणून सध्या कर्जत-जामखेडकडे पहिले जाते. येथील आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना येथून राष्ट्रवादीमधील कोण आव्हान देणार याबद्दलची ही चर्चा आहे. येथून इच्छुक असलेल्या युवा नेते रोहित पवार यांच्या उमेदवारीला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषाताई गुंड यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळेच गुंड यांच्यावर वरदहस्त कोणाचा, असाही प्रश्न येथील स्थानिकांना पडला आहे.

भाजपचे राम शिंदे यांनी या मतदारसंघावर आपली पकड मागील पाच वर्षांत पक्की केली आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना यासह इतर छोटे-मोठे गट त्यांनी जोडले आहेत. त्यामुळे यंदा पालकमंत्री शिंदे यांना येथील निवडणूक सोपी जाणार असे चित्र होते. मात्र, वर्षभरापासून या भागात पुणे जिल्हा परिषदेतील युवा व कार्यक्षम सदस्य आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथून शिंदे विरुद्ध पवार अशीच थेट लढत होईल असे बोलले जात होते. मात्र, मंजुषा गुंड यांनी उमेदवारीसाठी प्रसंगी वेगळा विचार करण्याचे बोलून दाखवीत थेट रोहित पवार यांनाच आव्हान दिले आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी मागील निवडणुकीत येथून उमेदवारी केली होती. त्यावेळी मंजुषा गुंड जिल्हा परिषद अध्यक्षा होत्या. मात्र, तरीही येथून राष्ट्रवादीचा उमेदवार थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता. त्यावेळी शिवसेनेचे रमेश खडे यांना दुसऱ्या क्रमांकाचे मतदान मिळाले होते. शिंदे यांचा मोठा विजय येथील जातीय व आर्थिक गणितांना भारी पडला होता. आता शिंदे यांनी पालकमंत्री म्हणून आर्थिक व सत्तेच्या राजकारणात पाळेमुळे आणखी पक्की करीत विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. अशावेळी येथून राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. गुंड यांच्याकडून अनपेक्षित आव्हान मिळाल्याने त्यांच्या पाठीमागे नेमकी कोणाची ताकद आहे, याचीच चर्चा आहे.

कर्जत-जामखेड तालुक्यांमध्ये अजित पवार यांच्या गटातील गुंड हे प्रमुख कार्यकर्ते आहेत. तर, फाळके हे शरद पवार यांचे निष्ठावंत आहेत. या पार्शवभूमीवर एकूणच येथील अंतर्गत संघर्ष नेमका का उफाळून आला याचे कोडे सामान्यांना पडले आहे. मंजुषा गुंड यांचे पती राजेंद्र गुंड यांचा या मतदारसंघात दबदबा आहे. मात्र, त्यांच्याप्रमाणेच इतरही अनेकंची येथील वोट बँक पक्की आहे. वेगवेगळे लढल्यावर येथून मतविभाजनाचा फायदा घेत शिंदे सहजपणे निवडणूक जिंकतात, हा इतिहास आहे. त्यातच गुंड हे पूर्वाश्रमीचे भाजप कार्यकर्ते आहेत. येथून त्यांना पक्षाने तिकीट डावलून शिंदे यांना तिकीट दिल्याने ते राष्ट्रवादीत विसावले. अजित पवार यांनी त्यांना ताकद देत जिल्हा परिषदेत अध्यक्षपदी संधी दिली. मात्र, आता त्यांनीच पक्षाला या ठिकाणी अडचणीत आणून राज्यभरात हा विषय चर्चेत आणला आहे.

पक्षातून की आधीच्या पक्षातून ताकद मिळून असोत, मंजुषा गुंड यांनी उमेदवारी केल्यास राष्ट्रवादीला येथून विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. अशावेळी शिंदे यांच्यासह भाजप सरकाविरुद्ध असलेली नाराजी राष्ट्रवादीला कितपत उपयोगी ठरेल हाही विवादाचा मुद्दा ठरेल. गुंड या येथील स्थानिक असल्याने त्यांनी उमेदवारी मागणे योग्य आहे. मात्र, येथील राम शिंदे यांच्या विरोधकांची मोट बंधने त्यांना कितपत शक्य आहे, याबद्दल अनेकजण खासगीत नकारात्मक कुजबुज करीत आहेत. मागील निवडणुकीत याच विसंवादी विचारांचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला होता. गुंड यांच्यामुळे यंदाही असेच चित्र निर्माण झाल्यास येथून भाजपचा विजय सुकर होईल. तसेच गुंड पुन्हा घरवापसी करीत भाजपवासी झाल्यास येथून राष्ट्रवादीला मोठा झटका बसू शकतो. मात्र, गुंड यांना आता राष्ट्रवादी शांत करण्यात यश मिळवणार असल्यास रोहित पवार यांना येथून विजयासाठीची संधी मिळू शकते असे चित्र आहे. मात्र, हे गुंड यांच्याच भूमिकेवर ठरणार आहे.

स्थानिक म्हणून दावेदारी : गुंड

माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी यापूर्वीच आपली भूमिका जाहीर करीत निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा प्रदेश राष्ट्रवादीला दिलेला आहे. त्यांनी स्थानिक असल्याचा मुद्दा आक्रमकपणे मांडून ही दावेदारी केली आहे. त्यामुळेच त्यांच्या पुअधील भूमिकेकडे राज्याचे लक्ष आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*