भाग पहिला | नॅनो तंत्रज्ञान आणि उद्योग-व्यवसाय

ग्रीक भाषेतून उगम असलेल्या नॅनो या शब्दाचा अर्थ लहान किंवा सूक्ष्म असा होतो. सूक्ष्म म्हणजे इतका सूक्ष्म की एक नॅनो मीटर म्हणजे एक भागिले एकावर नऊ शून्य इतके मीटर किंवा एका मीटरचा एक अब्जावा भाग. नॅनो परिणामाची तुलना करायची म्हटल्यास आपल्याला सर्वात बारीक वाटणारा केस हा तब्बल 80 हजार नॅनो मीटर जाडीचा असतो, जगभर थैमान माजवलेल्या एड्सचा विषाणू हा 90 नॅनो मीटर जाडीचा असतो. तर असा हा नॅनो कण सध्या जगभर चर्चेचा विषय आहे. हा पदार्थ खूप कमी प्रमाणात व्यवहारात असला तरी तंत्रज्ञान ज्या वेगाने वाढत आहे त्यावरून असे वाटते की लवकरच हे लहान लहान कण आपले रोजचे आयुष्य व्यापतील.

अठराव्या शतकात युरोपमध्ये आणि त्यानंतर जगभरच कापड उद्योग विकसित झाला. त्यानंतर रेल्वे विकसित झाली. विसाव्या शतकामध्ये अमेरिकेत आणि त्यानंतर जगभरात वाहन उद्योग भरभराटीला आला, याच वेळेस मायक्रो टेक्नॉलॉजी पूर्ण विकसित होऊन संगणक क्रांती झाली. सध्या चालू असलेले एकविसावे शतक हे नॅनो टेक्नॉलॉजीचे असेल. यामुळे आपली आयुष्यं भविष्यात पूर्णपणे बदललेली असतील. 1960 च्या सिलीकॉन युगानंतर माणसाने सेमीकंडक्टर चा वापर करून टीव्ही, ट्रान्समीटर, रेडिओ, संगणक यासारखी उपकरणे बनवली. जेव्हा या वस्तू पहिल्यांदाच बनवण्यात आल्या तेव्हा त्यांचा आकार व बनवण्याचा खर्च प्रचंड होता आणि या वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरच्या होत्या. त्यानंतर सुरुवात झाली मायक्रो-टेक्नॉलॉजी युगाची या तंत्रज्ञानाने वस्तूंचे आकारच घटवले नाही तर वस्तूंच्या किमती कमी होऊन त्यांचा काम करण्याचा वेग प्रचंड वाढला. मायक्रो- टेक्नॉलॉजी आज पूर्ण तेजीत असली तरी तिलाही काही मर्यादा आहेत; वस्तूंचा आकार काही पातळीपर्यंत घटवल्यानंतर पुढे तो कमी करणे शक्य होत नाही. तसेच त्यांचा वेग हा मर्यादित सीमेपर्यंत असतो. मायक्रो टेक्नॉलॉजीचा काळ फार तर 2030 पर्यंत राहील आणि त्यानंतर सुरुवात होईल नॅनो टेक्नॉलॉजी युगाची!

काय आहे नॅनो तंत्रज्ञान?
नॅनो टेक्नोलॉजी म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहू. या जगात असलेले सर्व पदार्थ हे अणूचे बनलेले आहेत. या पदार्थांमध्ये अब्जावधी अणू असतात. जेव्हा आपण हे पदार्थ बारीक बारीक करून त्यामध्ये केवळ 100 ते 1000 अणू बाकी ठेवतो तेव्हा त्या पदार्थाला नॅनो पदार्थ असे म्हणतात. जेव्हा कोणत्याही एका पदार्थापासून असा नॅनो पदार्थ आपण वेगळा करतो तेव्हा त्याचे गुणधर्म हे मूळ पदार्थापेक्षा भिन्न असतात. यासाठी आपण एका तांब्याच्या तारेचे उदाहरण घेऊ. तांबे हा धातू विजेचा उत्तम प्रवाहक म्हणून ओळखला जातो. जर आपण या तांब्यापासून नॅनो तार तयार केली तर ती चुंबकीय गुणधर्म दाखवील आणि हे गुणधर्म सुद्धा वेगवेगळ्या मापांना वेगवेगळे असतील. समजा ही तार 1000 नॅनो मीटर जाडीला चुंबकीय गुणधर्म दाखवत असेल तर तीच तार शंभर नॅनो मीटरला अधातू चे गुणधर्म दाखवेल. अशाच प्रकारे कोणताही पदार्थ नॅनो मापाचा केला तर त्याचे गुणधर्म बदलतात. हा एक अचाटच प्रकार आहे!

नॅनो तंत्रज्ञान हा केवळ संगणका पुरता मर्यादित असलेला भाग नव्हे. नॅनो तंत्रज्ञान जीवनाचा प्रत्येक भाग व्यापण्यास सक्षम असलेले तंत्रज्ञान आहे. नॅनो तंत्रज्ञानामध्ये आवश्यकतेनुसार भिन्न प्रकारचे अणू एकत्र मिसळून त्यांच्यापासून आपल्याला हवा तो पदार्थ तयार करता येतो. कापसासारखं हलकं लोखंड किंवा पाच टन वजन उचलू शकेल अशी प्लास्टिकची पिशवी अशा गोष्टी नॅनो तंत्रज्ञान वापरुन बनवता येतात. गेल्या दोन दशकात संशोधकांनी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे नॅनोकण, नॅनो ट्युब्ज, नॅनो फिल्मस असे अनेक नॅनो मापाचे पदार्थ बनवून त्यांचा अभ्यास केला आहे. आज धातू, अधातू, अर्धवाहक असोत किंवा मानव निर्मित प्लास्टिक सारखे पदार्थ असोत जवळपास सर्व पदार्थांची नॅनो रूपं बनवली जातात. ह्या नॅनो पदार्थांचा वापर करून नॅनो औषधे, नॅनो कापड, नॅनो रंग अशा वेगवेगळ्या गोष्टी बनवण्याची सुरुवात झाली आहे. नॅनोयूग आज स्वप्नातील गोष्ट वाटत असली तरी तंत्रज्ञानाने जी चुणूक दाखवली आहे त्यावरून असे ठामपणे वाटते की या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनमान पूर्णपणे ढवळून निघेल. स्वप्नरंजन वाटणाऱ्या नॅनो युगामध्ये सर्व काही बदललेले असेल. नॅनो पदार्थांपासून वेगवेगळ्या रंगांचा वापर करून बनवलेली कार वेगवेगळ्या अंतरावरून आणि अंशावरून वेगवेगळ्या रंगाची दिसेल. सध्या पॅरामॅग्नेटीक पेन्ट बनवण्याचे प्रयत्न संशोधक मोठ्या प्रमाणात करत आहेत. हा रंग जर कारला लावला तर आसपासच्या चुंबकीय क्षेत्राच्या बदलानुसार ही कार रंग बदलेल म्हणजे कारच्या आत बसून फक्त बटन दाबून आपल्याला हवा असलेला रंग कारला देता येईल. या उदाहरणावरून असे लक्षात येते की आपली जगाशी समन्वय साधण्याची किंवा व्यक्त होण्याची पद्धत पूर्णपणे बदललेली असेल.

नॅनो तंत्रज्ञान आणि उद्योग-व्यवसाय:
नॅनो तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणात उद्योग संधी निर्माण करील यात कसलेही दुमत नाही. तरुण व्यवसायिकांनी या क्षेत्राच्या बाबतीत अपडेट राहिले पाहिजे. या क्षेत्रात लावले जाणारे शोध प्रचंड आर्थिक उलथापालथ करू शकतात. सध्या अस्तित्वात असलेला एखादा प्रॉडक्ट कालबाह्य ठरू शकतात किंवा एखादी नवी अत्यंत स्वस्त अशी उत्पादन व्यवस्था निर्माण करू शकतात. भारतातील हे असे क्षेत्र आहे ज्यात कसलीही स्पर्धा नाही!

पुढील भागात नॅनो तंत्रज्ञानाचा वापर करून करता येण्यासारख्या उद्योग संधीच्या बाबतीत चर्चा करूत.

लेखक : शेख रियाझ, बिजनेसवाला, लातूर
मो. 7378926295

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*