भाग दोन | नॅनो तंत्रज्ञान

मागील भागात आपण नॅनो तंत्रज्ञानची तोंड ओळख करून घेतली, या भागात आपण नॅनो तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या बाबतीत माहिती घेऊत.

आजच्या घडीला एखादी नवीन इंडस्ट्री निर्माण करू शकेल असे पदार्थ शास्त्रज्ञांनी बनवलेले आहेत उदाहरणार्थ एअरोजेल, या पदार्थात चक्क 95% हवाच असते आणि उरलेले पाच टक्के घन पदार्थ असतो. त्यामुळे हा पदार्थ अतिशय हलका असतो. इतका हलका की कापूस यापेक्षा जड वाटावा. याची खासियत अशी की यातून उष्णता वाहू शकत नाही म्हणजे या पदार्थापासून उष्णतारोधक पदार्थ मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाऊ शकतात. हा पदार्थ स्वतःच्या वजनाच्या पाच लाख पट वजन पेलू शकतो. म्हणजे एक किलो वजनाचे एअरोजेल तब्बल एक लाख टन वजन न तुटता पेलू शकतो. या गुणधर्माचा वापर करून वेगवेगळे जड पदार्थ साठवण्यासाठी एअरोजेलचा वापर करून बनवलेले साचे निर्माण करता येतील. मटेरियल हँडलिंग अँड स्टोरेजमध्ये याला विलक्षण वाव आहे.

याच श्रेणीमध्ये दुसरे नाव घेता येईल ते म्हणजे ग्राफीनचे. हे ग्राफीन एकविसाव्या शतकात राज्य करणार यात कसलीही शंका नाही. ग्राफीनचा शोध लावल्याबद्दल आंद्रे जेईम आणि कॉन्स्टंटिन नोव्होसेलाव्ह या दोन शास्त्रज्ञांना 2010 सालचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं. कागदापेक्षा लाख पटीने पातळ असलेला ग्राफीन सर्वोत्तम पोलादापेक्षा शंभर पट मजबूत असतं. पूर्णपणे पारदर्शक असलेला ग्राफीन इतका घन असतो की सर्वात लहानशा हेलियमच्या अणूलाही प्रवेश नाकारतो. त्यातही कहर म्हणजे हा विजेचा सर्वोत्तम वाहक असतो.

या श्रेणीत तिसरे नाव आहे कार्बन नॅनो ट्युब्ज. 1991 साली जपानच्या सूमीयो ईजिमा या संशोधकाने शोधलेल्या कार्बनच्या या चौथ्या रूपाला कार्बन नॅनो ट्यूब असे संबोधले गेले. कार्बन नॅनो ट्यूब ही ग्राफाईट च्या अतिशय पातळ पत्र्याची गुंडाळी करून बनवलेली नळी असते. एखादी नॅनो ट्युब जर आर्मीचेअर नावाच्या प्रकाराची असेल तर ती धातू प्रमाणे वागते. म्हणजे जर ती बॅटरीला जोडली तर इलेक्ट्रॉन जसा तांब्याच्या तारेतून धावतो त्यापेक्षा कितीतरी पटीने ह्या ट्यूब मधून धावतो. विशेष म्हणजे ह्या तापात ही नाहीत आणि तापल्यामुळे जी वीज वाया जाते ती ह्या कार्बन नॅनो ट्युब्जने वाचते. अशा या आर्मीचेअर कार्बन ट्यूब तांब्या सारख्या महाग धातूला उत्तम पर्याय देऊ शकतात. या ट्युब्जची उष्णता वहन करण्याची क्षमता इतर कोणत्याही धातूपेक्षा सगळ्यात जास्त आहे. या कार्बन नॅनो अतिशय मजबूत असतात इतका की त्यांचा तन्यता बिंदू हा पोलादापेक्षा 900 पट जास्त आहे.

यासोबतच नॅनो पदार्थांमध्ये कार्बनचा रेणू फूलरिन, मेटा मटेरियल्स इत्यादी हेसुद्धा महत्त्वाचे पदार्थ आहेत आणि जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये क्रांती घडवून आणण्यास सक्षम आहेत. अन्न, पेयजल, ऊर्जा, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि पर्यावरण या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. स्थूलमानाने नॅनो तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये कशा प्रकारे आपली भूमिका बजावते हे आपण पाहू. या क्षेत्रातल्या समाजाच्या गरजा भागविण्यासाठी उद्योजक नॅनो तंत्रज्ञानाचा खुबीने उपयोग करून या क्रांतीमध्ये आपले योगदान देऊ शकतात आणि आपली उन्नती साधू शकतात.

अन्न:
आज जगाची लोकसंख्या सहाशे चाळीस कोटी आहे 2050 पर्यंत 890 कोटीपर्यंत वाढण्याचे गृहीत आहे. याचा 98 टक्के हिस्सा ही गरीब आणि अविकसित राष्ट्रे असतील. सध्या भारतात 125 कोटींच्या आसपास लोक राहतात त्यापैकी 70 टक्के लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा हा शेतीच असला तरी सर्वात उपेक्षित क्षेत्र मात्र शेतीच आहे. आज पारंपारिक तंत्रज्ञान बाजूला ठेवून जगातल्या सगळ्या लोकांची भूक भागेल असे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. या प्रयत्नातूनच नॅनो तंत्रज्ञानाने शेतीत घुसायला सुरुवात केली आहे. यातूनच नॅनो सेंसर, नॅनो कीटकनाशक, स्वस्त अशी जलशुद्धीकरण यंत्र यांचा वापर करून अचूक शेती केली जात आहे. अतिप्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून किडीला प्रतिकारक, जास्त धान्य पिकवणारी पिके व कमी पाणी लागणारी पिके निर्माण केली जात आहेत. देशातील 70 टक्के लोकसंख्या ही या क्षेत्राशी निगडित व्यवसायांमध्ये असल्यामुळे उद्योजक खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय करू शकतात.

पेयजल:
शुद्ध पेयजल ही मानवाची अन्नापाठोपाठ दुसरी मोठी गरज आहे. जगाला 2030 पर्यंत 60 टक्के अधिक पिण्यायोग्य पाण्याची गरज पडेल. जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या ही 2050 साली दुष्काळाने त्रस्त असेल. त्यावेळी नॅनो तंत्रज्ञान हाच एकमेव उपाय असेल. याद्वारे अत्यंत कमी खर्चात समुद्राच्या पाण्याचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करता येईल. आजही नॅनो तंत्रज्ञान वापरून बनवलेले वाटर प्यूरीफायर खूप स्वस्तात उपलब्ध होत आहेत. उद्योजक या क्षेत्रात आपले कर्तुत्व आजमावू शकतात.

ऊर्जा:
अन्न आणि पाण्यानंतर ऊर्जा ही मानवाची मूलभूत गरज आहे 2025 पर्यंत जगाला लागणारी ऊर्जा ही 50% ने वाढण्याचे गृहीत आहे. अगदी अन्न शिजवण्या पासून ते कृत्रिम उपग्रह सोडण्यात पर्यंत आपल्याला ऊर्जा लागते. ही ऊर्जा आपण उष्णता, प्रकाश, वीज, अशा रूपात वेगवेगळ्या कामांसाठी वापरतो. ऊर्जा पुरवण्यासाठी लागणाऱ्या कोळसा, पेट्रोल, डिझेल अशा इंधनाचे साठे मात्र झपाट्याने संपत आले आहेत. यावर तोडगा म्हणून सोलार ऊर्जा आणि इतर नविकरणीय उर्जा स्त्रोतांकडे पाहिले जाते; मात्र अजूनही सोलार ऊर्जेचे पॅनल सामान्य माणसांसाठी खूप महाग आहेत आणि त्यातून खूप कमी प्रमाणात वीज निर्माण होते. यावर पर्याय म्हणून नॅनो पदार्थांपासून बनविलेले सोलार सेल निर्माण करण्याचे काम कंपन्या करत आहेत. कोनार्क कंपनीने कमी प्रकाशातही विज निर्माण करणारे अत्यंत हलक्या वजनाचे सोनार सेल्स बनवले आहेत. शिवाय सोलर सेल सारखं काम करणार कापडही बनवलं आहे अशा कापडापासून जर तंबू बनवले तर उंच पर्वतावर दाट जंगलात सुद्धा आपण लाईट लावू शकू. एवढेच काय सिनेमाही पाहू शकू! नॅनो सिस्टीम नावाच्या एका कंपनीने सोलार सेल्स म्हणून काचेच्या खिडक्याचाच वापर करायला सुरुवात केली आहे. खिडकीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचं विजेत रूपांतर करून घराला किंवा ऑफिसला लागणारी बरीचशी आपण यांपासून मिळवू शकतो. ढगाळ वातावरणात सुद्धा वापरता येतील असे इन्फ्रारेड सोलार बनवण्याचे प्रयत्न कंपन्या करत आहेत. देशाची आणि राज्याची विजेची भूक पाहता आणि विजेचे वाढणारे दर पाहता या क्षेत्रांमध्ये व्यावसायिकांसाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत. विज निर्माण करणाऱ्या उपकरणांपासून ते विजेची वाहतूक आणि नियमन करणाऱ्या उपकरणांच्या निर्मिती पर्यंत व्यवसायिक आपले योगदान देऊ शकतात.

निवारा
वाढत्या लोकसंख्येला स्वस्त आणि टिकाऊ अशी घरे पुरवणे विकासकांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. नॅनो पदार्थांचा वापर करून वजनाने अत्यंत हलके, अति मजबूत असे बांधकाम साहित्य निर्माण करणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानाने सिमेंटची पत सुधारणे देखील शक्य झाले आहे. बार्टोस 2004 यांच्या अहवालानुसार नॅनो तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि बांधकाम या क्षेत्रांमध्ये पूर्णतः बदल घडवून आणेल. नॅनो पदार्थापासून बनवलेल्या भिंती कारखान्यात तयार करून मग साइटवर उभ्या करता येऊ शकतात. त्यामुळे अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चात घरे बांधणे आता सहज शक्य आहे. उद्योजक या संधीचा फायदा घेऊ शकतात.

आरोग्य:
नॅनो तंत्रज्ञानाचा सर्वाधिक प्रभाव वैद्यक क्षेत्रावर होईल. दूषित वातावरणामुळे मानवी आरोग्य खालावत आहे. मागील वीस वर्षांमध्ये एकूण 30 अशा नवीनच संसर्गजन्य रोगांचे निदान झाले आहे. हे रोग जगातल्या 30% मृत्यूला कारणीभूत आहेत. यामध्ये एड्स, इबोला, कॅन्सर आणि इव्हीन फ्लू यांचा समावेश होतो. तंत्रज्ञानामुळे असाध्य असे वाटणाऱ्या रोगांवर नवनवीन औषध निर्मिती होत आहे. कॅन्सर यांसारख्या रोगांवर उपचार करण्यासाठी नॅनो रोबोट्स वापरले जाऊ शकतात. हे रोबोट शरीरात जाऊन नको असलेल्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करतात. वेगवेगळ्या शस्त्र क्रिया करण्यासाठी हे नॅनो रोबोट प्रोग्राम केले जाऊ शकतील. नुकतेच शास्त्रज्ञांनी कॅन्सरच्या पेशी जाळणारे सोन्याचे नॅनोकण शोधून काढले आहेत.

नॅनो तंत्रज्ञान हे भारतीय विशेषतः मराठी व्यावसायिकांसाठी पूर्णतः नवीन अशी संकल्पना आहे. चर्चिलने म्हटल्याप्रमाणे- आशाळभूतपणे वाट पाहणाऱ्यानाही काही गोष्टी मिळतात पण त्या गोष्टी निरर्थक म्हणून वेगाने घोडदौड करणाऱ्यांनी फेकून दिलेल्या असतात. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण सजग राहिलो तर आपण निश्चितच वेगाने वाटचाल करणारे बनू अन्यथा आशाळभूतपणे वाट पाहण्याखेरीज आपल्याकडे अन्य पर्याय नसेल. आपल्याकडे एका महान अशा तांत्रिक क्रांतीचे कर्ते आणि साक्षीदार होण्याची अमूल्य अशी संधी आहे. जागतिक कंपन्या जगण्याची दिशा आणि दशा बदलण्यासाठी अव्याहतपणे संशोधन करत आहेत. यात आर्थिक फायदा तर आहेच शिवाय आपण जगाला आपल्या तंत्रज्ञानाने नियंत्रित करू शकू!

लेखक : शेख रियाझ, बिजनेसवाला, लातूर
मो. 7378926295

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*