Blog | व्याधी आणि उपचार पद्धती

समाजात लोकांना अनेक व्याधी असतात परंतु या व्याधींचे उपचार करताना प्रत्यक्ष व्याधीने ग्रस्त असणा-या व्यक्तीला लोक उपचाराचा जो सल्ला देतात तो मात्र विचित्र असतो. अज्ञानात आनंद असतो याचा प्रत्यय उपचाराबाबत तर अनेक वेळा येतो. ब-याच वेळा डॉक्टरच्या नादाला लागलास तर रोग बरा होणार नाही, उलट तो डॉक्टर तुला लुटेल, असा समज पसरवणारे लोक समाजात प्रचंड आढळून येतात. अनेक लोक डॉक्टरकडे न जाता केवळ दुकानातून पोट दुखतंय म्हणून गोळ्या किंवा डोळ्याचे ड्रॉपही घेऊन जातात. कारण त्यांना डॉक्टरांची फिस परवडत नाही म्हणून नव्हे तर मुळात त्यांची वृत्ती तशीच असते. कांहीजण तर अजूनही गावठी उपचारावर विश्वास ठेवतात. म्हणजेच त्यांचा एम डी डॉक्टरपेक्षा झाडपाला देणारा गावठी उपचार योग्य वाटतो. रूग्णाची स्थिती फारच बिकट झाल्यावर ते एक्सपर्ट डॉक्टरचा सल्ला घ्यायला येतात, तेंव्हा ब-याचवेळा वेळ निघून गेलेली असते.

महत्वाचं म्हणजे अनेक जण रोग झाल्यावर सर्वप्रथम देवादिकाचं कांही करायचं राहीलंय का हे पाहतात. गंडेदोरेही करतात. कारण त्यांच्या मनावरील धार्मिक भावनेत ईश्वरशरणता आणि अंधश्रद्धा जास्त असते. म्हणून व्याधी कडे वा त्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष होईल अशी स्थिती या धार्मिकतेतून येते.

आग आगीला मारते हा डायलॉग तर मी अनेक पक्षकारांकडून कित्येकवेळा ऐकला आहे. माझे अनेक मित्र डॉक्टर आहेत. एकदा एका हॉस्पीटलमधे एक पेशंट हाताला भाजलं म्हणून आठ दिवसांनी आला होता. तर समजलं की भाजल्यावर आग कमी व्हावी यासाठी, आग आगीला मारते म्हणून जखमेवर कुणाच्या तरी सांगण्यावरून चक्क तिखट टाकले होते. बिचा-याला त्याने किती त्रास झाला असेल त्याचे त्यालाच माहीत पण ही वस्तुस्थिती आहे की लोकांचा विश्वास अशा गावठी उपचारावर जास्त असतो.

एका व्यक्तीचा मणका सरकला आणि पाठीची संवेदना नष्ट झाली. गरम वीटेने पाठ शेकावी म्हणून एका विद्वानाने सल्ला दिला आणि वीट गरम करून शेकताना संवेदना नष्ट झाल्यामुळे शेक किती द्यायचा याचा अंदाजच आला नाही. अखेर पाठीला शेकण्याच्या नादात पाठीला पोळून, जखमा होऊन तो व्यक्ती गेला! पण अशी उदाहरणे समजात जास्त प्रसारीत होत नसल्यामुळे गावठी उपचारांचे जनमानसावरील गारूड अद्यापही संपले नाही.

व्याधी, उपचार आणि बुवाबाजी याचा खूप जवळचा सबंध आहे. कित्येक बुवा, बाबा, महाराज, संत, महंत हे त्यांच्या धार्मिक क्षेत्रातील ज्ञानापेक्षा ते रोग बरे करतात या जनसामान्यातील भावनेमुळे लोकप्रिय आहेत किंवा ते त्याच कारणामुळे निर्माण झालेल्या भासमान श्रद्धेमुळे त्यांची लोकप्रियता कायम राहीलेली आहे. कारण आजार बरा झाला आहे की वाढला आहे याची जाणीवच ते त्यांच्या धार्मिक वलयाच्या प्रभावाखाली रूग्णास होऊ देत नाहीत.

ही सर्व उदाहरणे शारीरीक व्याधींची आहेत, मानसिक व्याधीबद्दलची स्थिती तर यापेक्षाही भयानक आहे. लोक स्वत:स जीवंत राहण्यासाठी शारीरीक आरोग्याबाबत असा विचार करत असतील तर मानसिक व्याधीची चिंता त्यांच्या खिजगिणतीही नाही. मुळात आपल्याला कांही मानसिक आजार झाला आहे ही बाबच मान्य करायची अनेकांची तयारी नसते. मग मानसिक आजारावरील उपचार तर खूप लांबची बाब आहे आणि मानसिक आजारावरील उपचाराबाबत त्यांची काय मते असतील याचा विचार करणेही कल्पनेपलिकडील आहे.

देशात मनोरूग्णांची संख्या वाढते आहे ही बाब, देशातील बेरोजगारी वाढत आहे, देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे, भारतीय चलन रूपया रसातळास गेले आहे, दरडोई उत्पन्न घटले आहे, विकास दर खालावला आहे, लोकशाही धोक्यात आली आहे आदी दुरावस्थेपेक्षा अधिक महत्वाची आहेे.

एकंदर पाहता बहुसंख्य भारतीय समाज मानसिक रोगाने अधिक पछाडलेला आहे आणि त्या बहुसंख्य समाजाची ईच्छा हे वास्तव मान्य करण्याची आजीबात नाही. उलट मानसिक रोगावर योग्य उपचार घेण्याऐवजी गावठी उपचार करत झाडपाला देणा-या, गंडेदो-या देणा-या धार्मिक व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊन योग्य उपचार करणा-याला शत्रु समजण्याची प्रवृत्ती जास्त दिसून येत आहे.

सामाजीक जीवनातील आर्थिक, राजकीय, सामाजीक, सांस्कृतिक ही सर्व क्षेत्रे ही बहुतांश भारतीयांच्या या मानसिक व्याधींनी आज बाधीत झाली आहेत.

© राज कुलकर्णी

राजकीय-सामाजिक अभ्यासक, उस्मानाबाद

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*