म्हणून शिक्षक दाखविणार मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे..!

अहमदनगर :

विना अनुदानित उच्च महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान द्यावे, प्राध्यापकांना पगार सुरू करावा या प्रमुख मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ रविवारी (दि.11) जिल्हा दौर्‍यावर येणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा विना अनुदानित उच्च महाविद्यालयाचे प्राध्यापकांनी दिला आहे.

शासन विनाअनुदानित प्राध्यापकांच्या मागण्यांबाबत वेळकाढूपणा करत असल्याच्या निषेधार्थ क्रांतीदिनापासून विनाअनुदानित महाविद्यालयातील प्राध्यापक बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील महाविद्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. राज्यातील विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी गत पंधरा वर्षांपासून विनाअनुदानित विनावेतन काम करत आहेत. 2014 पासून विनाअनुदानित शाळा व तुकड्यांचे मूल्यांकन करुन मूल्यांकनास पात्र वर्ग, तुकड्या अनुदानास पात्र घोषित न केल्यामुळे या सर्व शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सातत्याने अन्याय होत असल्याची भावना या शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

न्याय व सदनदशीर मागण्या मान्य होण्याकरिता वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. तत्कालिन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गत चार वर्षांपासून प्राध्यापकांच्या तोंडाला पाने पुसली. शासनाला जागे करण्यासाठी व प्राध्यापकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी तसेच मुख्यमंत्री यांनी प्राध्यापकांचे प्रश्‍न समजण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पाथर्डी येथे एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस येत असून त्यांना काळे झेंडे दाखविण्यात येणार आहे. या आंदोलनात प्राध्यापक एस. पालवे, देविदास हरवणे, सुभाष चिंधे, रवींद्र घायतडक, दीपक बोरूडे, नितीन साळवे, लक्ष्मण बेळगे, संजय बाबर, एस. शेख, एस.शिरसाठ कैलास गुंजाळ, एम. मोटे, के. गवळी, एल. जवरे, विठ्ठल काटे, संजय शेवाळे, गणेश पुंड, ज्ञानेश्‍वर बर्डे, किशोर सप्रे, प्रवीण पाटील, अलीम बागवान, शेखर अंधारे, ऋषीकेश मातडे, उमादेवी शेळके, कल्पना तुपे, विद्या कदम, सुवर्णा राहिंज यांच्यासह नगर, पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगाव, नेवासा, कर्जत, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, जामखेड तालुक्यातील प्राध्यापक भाग घेणार आहेत. 

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*