पूरबाधितांना पाठविले ३२ ट्रक जीवनाश्यक वस्तू

पुणे :
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यान्वित करण्यात आलेल्या पूरग्रस्त मदत केंद्रातून आतापर्यंत 32 ट्रक जीवनाश्यक वस्तू कोल्हापूर व सांगली येथे पाठविण्यात आले आहेत.

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सुबोध भावे यांनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेऊन पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या पूरग्रस्तांना कोणत्या वस्तू व साहित्याची आवश्यकता आहे, याची माहिती जाणून घेतली व पूरग्रस्त सहाय्य मदत केंद्राला भेट दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाने त्यांना आवश्यकता असणाऱ्या वस्तूंची यादी दिली. यावेळी त्यांच्या समवेत सिनेअभिनेते विनोद खेडेकर, अश्विनी तेरणेकर उपस्थित होते.

आपले बांधव पुरामुळे अडचणीत सापडले आहेत. अशा बिकट प्रसंगी आपण सर्वांनी मदतीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. ही दुर्घटना हृदय हेलावून टाकणारी असल्याची भावना श्री. भावे यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुराचे पाणी ओसरत आहे. या पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत, वस्तू व सेवा-सुविधा गतीने पोहोचविणे आवश्यक आहे. यापुढे मदत पोहोचविण्याबरोबरच आरोग्य सेवा पुरविणे तसेच साफ-सफाईवर भर देणे गरजेचे आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने या भागातील साफ-सफाईची कामे करुन घेऊन कचरा हटवून निर्जंतुकींची कामे गतीने करावीत. पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने दुरुस्ती व अन्य कार्यवाही करावी. वीज पुरवठा खंडित असणाऱ्या भागातील वीज पुरवठा तात्काळ सुरु करावा. पुराचे पाणी ओसरलेल्या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुरु कराव्यात.

यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना आवश्यक सेवा-सुविधा गतीने पोहचविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. उपायुक्त श्रीमती निलिमा धायगुडे यांच्या देखरेखीखाली मदत केंद्राचे कामकाज सुरु असून विविध संस्था, संघटना व दानशूर व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात मदत होत आहे.

आपल्या मित्रांपर्यंत ही बातमी पोचवा..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*